चिपळूण (जि. रत्नागिरी) : कोकणातील शेतकऱ्यांना योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून होत आहे. पशुसंवर्धन व दुग्धक्षेत्रात ते जे काम करीत आहेत, त्यामुळे काेकणात पशुसंवर्धन, दुग्ध क्षेत्रात एक प्रकारची क्रांती घडत आहे. हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे चिपळूण येथे कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार भास्कर जाधव, काेकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे उपस्थित होते.शरद पवार पुढे म्हणाले की, आपण केंद्रीय कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी देशात धान्य आयात करावे लागत होते. मात्र, नंतर देशातील शेती फायदेशीर कशी होईल, या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतले गेले. त्यामुळे भारत हा तांदूळ उत्पादनात जगात प्रथम क्रमांकाचा देश बनला. कालांतराने धान्य निर्यातीत भारत १८ व्या क्रमांकाचा बनला, असे ते म्हणाले.कोकणात मत्स्य, कृषी, पशू, दुग्धक्षेत्रात मोठी संधी आहे. कोकणचा चेहरामोहरा बदलतोय तो आणखी बदलेल आणि कोकणचा भाग संपन्न होईल. या भागाचा नावलौकिक होईल, असा विश्वास व्यक्त करताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने या दृष्टीने आणखी पावले टाकावीत, असे ते म्हणाले.
कोकणातील पशुसंवर्धन, दुग्धक्षेत्रात क्रांती घडतेय; शरद पवार यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:55 IST