राजापूर : मुंबई गोवा महामार्गावर आज, शनिवारी (दि.१९) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पन्हळे माळवाडी येथे केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली. इतकी मोठी घटना घडूनही तालुक्याची आपत्ती व्यवस्थापण यंत्रणा अथवा पोलिस यंत्रणा वेळेत न पोहोचल्याने येथील ग्रामस्थांनी या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गिकेवरुन सोडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.गोव्याहून मुंबईच्या दिशेने केमिकल वाहून नेणारा हा टॅंकर तालुक्यातील पन्हळे माळवाडी येथे आला असता त्याला अचानक आग लागली. हवेत धुराचे लोट पसरल्याने ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली. स्थानिकानी घटनास्थळी धाव घेत लागलीच गोव्याहून मुंबईच्या दिशेने असणारी वाहतूक थांबवून ती दुसऱ्या एकेरी मार्गावरुन वळवली आहे. या टॅंकरच्या चाकांनीही पेट घेतला असून हवेत धुराचे लोट उसळले आहेत. मात्र एक तासाहून अधिक काळ लोटला तरी ही आग आटोक्यात आणण्यासाठी तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापण यंत्रणेने कोणतीच हालचाल न केल्याने व अग्निशमनयंत्रणाही न पोहोचल्याने सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाची वाट पाहून अखेर स्थानिकांनी एकेरी मार्गावरील वाहतूक थांबवल्याने मोठा अनर्थ टळला.
Ratnagiri: राजापुरात केमिकल टँकरला भीषण आग, ग्रामस्थांमुळे मोठा अनर्थ टळला; हवेत धुराचे लोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:03 IST