रत्नागिरी : शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर कोकणात सर्वाधिक वर्चस्व कोणाचे, हा प्रश्न सातत्याने पुढे येतो. रत्नागिरी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत उद्धव सेनेला अधिक मते मिळाली. विधानसभेत शिंदे सेनेने मोठी बाजी मारली. आता नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनांसाठी वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. त्यातूनच महायुती आणि महाविकास आघाडीत दोन्ही शिवसेनाच अधिक जागांवर लढत आहे. जिल्ह्यात १५१ जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या ४५७ उमेदवारांपैकी १०८ उमेदवार उद्धव सेनेचे तर १०४ उमेदवार शिंदे सेनेचे आहेत.राज्यातील राजकीय समीकरणे २०१९ साली सर्वांत प्रथम बदलली. शिवसेना आणि भाजपला मतदारांनी मोठी पसंती दिली होती आणि निकालानंतर हे दोन पक्ष स्वतंत्र झाले. २०२२ मध्ये त्यात पुन्हा मोठा बदल झाला. शिवसेनेचे दोन भाग झाले. उद्धव सेना महाविकास आघाडीत राहिली आणि शिंदे सेनेने भाजपही हातमिळवणी करून पुढे महायुती अस्तित्वात आली.कोकण हा वर्षानुवर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला. २०२२ मध्ये शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर साहजिकच कोकणात कोणाचे वर्चस्व असा मुद्दा सुरू झाला. २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्याची पहिली परीक्षा झाली. त्या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव सेना उत्तीर्ण झाली. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत महाविकास आघाडीतील उद्धव सेनेला अधिक मते मिळाली. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनाच अव्वल असल्याचे दिसले.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या गणितापेक्षा आता होणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीचे गणित अधिक वेगळे आहे. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. इथे राज्य आणि देशाचा विचार होत नाही. आपला प्रभाग, आपले शहर याचा विचार केला जातो. तळागाळाशी संपर्क असलेल्या व्यक्तींचाच स्वीकार केला जातो. कोणत्या पक्षाकडे किती ताकदवान कार्यकर्ते आहेत, हे या निवडणुकीतून दिसते. त्यामुळे दोन्ही शिवसेनांनी या निवडणुकीसाठी विशेष जोर लावला आहे.आपली ताकद अधिक आहे, हे दाखविण्यासाठी दोन्ही शिवसेना अधिकधिक जागांवर लढण्यास उत्सुक होत्या. चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतीत मिळून नगरसेवकांच्या १५१ जागा असून, त्याकरिता ४५९ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये उद्धवसेनेचे १०८, शिंदे सेनेचे १०४, भाजपचे ३६, काँग्रेसचे ३५, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ४१, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे २३ अन्य पक्षांचे १४ उमेदवार आहेत. यावेळी बंडखोरीचे प्रमाण वाढल्यामुळे तब्बल ९६ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
Web Summary : Ratnagiri witnesses a fierce battle between Shinde and Uddhav Senas in local body elections. After split in Shivsena, both factions vie for dominance. With 108 Uddhav Sena and 104 Shinde Sena candidates contesting, the elections are a crucial test of strength at the grassroots level.
Web Summary : रत्नागिरीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदे आणि उद्धव सेनेत जोरदार लढत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गट वर्चस्वासाठी स्पर्धा करत आहेत. 108 उद्धव सेना आणि 104 शिंदे सेना उमेदवार निवडणुकीत उतरल्याने, ही निवडणूक तळागाळातील ताकदीची महत्त्वपूर्ण परीक्षा आहे.