रत्नागिरी : मित्रासोबत शिकारीसाठी गेलेल्या रत्नागिरीतील प्रसिद्ध नेमबाजपटूला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्याकडून शिकार केलेला डुक्करही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (१५ एप्रिल) रोजी मध्यरात्री राजापूर तालुक्यातील कशेळी बांध येथे करण्यात आली. याप्रकरणी नाटे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.रत्नागिरीतील झाडगाव एमआयडीसी येथील पुष्कराज जगदीश इंगोले (३६) व जाकीमिऱ्या येथील त्याचा मित्र रोहन रामदास बनप अशी दाेघांची नावे आहेत. हे दाेघे शनिवारी रात्री सेंट्रो गाडी घेऊन कशेळी - गावखडी परिसरात शिकारीसाठी गेले होते. रात्री बारा वाजता डुकराची शिकार करून हे दाेघे रत्नागिरीच्या दिशेने येत हाेते.त्यावेळी एक वरिष्ठ पोलिस अधिकारी गस्त घालत राजापूरच्या दिशेने जात होते. कशेळी बांध परिसरात सेंट्रो गाडी संशयास्पदरीत्या उभी असलेली त्यांना दिसली. त्यांनी चौकशी केली असता सिंगल बॅरल बंदूक आढळली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून गाडीची झडती घेण्यात आली. त्यावेळी गाडीमध्ये मृतावस्थेत डुक्कर आढळला.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पुष्कराज जगदीश इंगोले आणि रोहन रामदास बनप यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३,१२५, वन्यजीव प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये नाटे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
रत्नागिरीतील नेमबाजपटूची मित्रासमवेत झाली ‘शिकार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 19:02 IST