शिमगोत्सवाला रत्नागिरीतील वरवडे खाडीत मुली असलेली बोट बुडाली

By अरुण आडिवरेकर | Published: March 24, 2024 09:56 PM2024-03-24T21:56:15+5:302024-03-24T21:57:53+5:30

दरवर्षी शिमगोत्सवाला खाडीत सहकुटुंब नौका घेऊन जाण्याची वरवडे खारवीवाडा येथील समाजाची प्रथा आहे.

A boat carrying girls sank in Varavade Bay in Ratnagiri | शिमगोत्सवाला रत्नागिरीतील वरवडे खाडीत मुली असलेली बोट बुडाली

शिमगोत्सवाला रत्नागिरीतील वरवडे खाडीत मुली असलेली बोट बुडाली

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे खाडीत फिरण्यासाठी गेलेल्या मुलींची बोट समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२:३० वाजता घडली. सुदैवाने या बोटीतील बाराही मुली बचावल्या. मिळालेल्या माहितीनुसार बोट बुडाल्याने या बोटीतील १२ मुली पाण्यात पडल्या. मात्र, शिमगोत्सवामुळे किनाऱ्यावर असलेले स्थानिक मच्छिमार आणि ग्रामस्थांनी तत्काळ या मुलींना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

दरवर्षी शिमगोत्सवाला खाडीत सहकुटुंब नौका घेऊन जाण्याची वरवडे खारवीवाडा येथील समाजाची प्रथा आहे. रविवारी होळीनिमित्त वरवडे येथील काही नौका खाडीत उतरल्या होत्या. यातील एक नौका खाडीत बुडाली. या बोटीत एकाच कुटुंबातील जवळपास १२ मुली होत्या. बोट उलटताच बोटीतील मुलींनी एकच आरडाओरड केली. यावेळी आजूबाजूला असलेल्या नौका मालकांनी बचावासाठी धाव घेतली. आजूबाजूला असलेल्या नौकांमधील ग्रामस्थांच्या सहकार्याने बुडालेल्या मुलींना वाचवण्यात यश आले. 

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी नीलेश माईनकर, जयगडचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: A boat carrying girls sank in Varavade Bay in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.