वणव्यात पेटलेले वडाचे झाड कोसळले, संगमेश्वर-देवरुख राज्यमार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प
By अरुण आडिवरेकर | Updated: June 10, 2023 14:15 IST2023-06-10T14:13:29+5:302023-06-10T14:15:00+5:30
वृक्ष कोसळला त्या दरम्यान मार्गावरुन कोणतेही वाहन जात नसल्याने सुदैवाने दुर्घटना टळली

वणव्यात पेटलेले वडाचे झाड कोसळले, संगमेश्वर-देवरुख राज्यमार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प
रत्नागिरी : संगमेश्वर - देवरुख राज्यमार्गावर करंबेळे सहाण येथे शुक्रवारी (९ जून) सायंकाळी ४:३० च्या सुमारास एक जुनाट वडाचे झाड कोसळून दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. बाजूच्या शेतात लावलेल्या वणव्यात जळून हा वृक्ष काेसळल्याने ही दुर्घटना घडली.
वट वृक्ष कोसळला त्या दरम्यान सुदैवाने कोणतेही वाहन जात नसल्याने गंभीर घटना टळली. वट वृक्ष कोसळण्याआधी काही क्षण पांचाळ नामक दुचाकीस्वार तेथून गेले होते. जोरदार आवाज झाल्याने त्यांनी मागे वळून पाहिले तर वडाचे अजस्त्र झाड कोसळलेले त्यांना दिसले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
देवरुख येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने आपले कर्मचारी मठकर यांना घटनास्थळी पाठवून वटवृक्षाला लागलेली आग विझविण्यासाठी टॅंकरची व्यवस्था केली. शासकीय ठेकेदार संदीप रहाटे यांनी जेसीबी घेऊन चालक पिंट्या चव्हाण यांना वटवृक्ष बाजूला करण्यासाठी घटनास्थळी पाठवले. पोलिस नाईक सचिन कामेकर आणि माजी सरपंच शरद पवार यांनी काेसुंब येथील महावितरण विभागाला माहिती देऊन वीजप्रवाह बंद करण्यास ऑपरेटर किरण लिंगायत यांना सांगितले.
संगमेश्वर पोलिस स्थानकाचे पोलिस नाईक सचिन कामेरकर यांनी घटनास्थळी स्वतः उभे राहून आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच वाहनांच्या रांगा लावून घेतल्या. करंबेळे गावचे पोलिस पाटील सुवारे, माजी सरपंच शरद पवार अन्य ग्रामस्थ यांनी वटवृक्ष हलविण्यासाठी मेहनत घेतली. मार्गावरील वाहतूक दाेन तास ठप्प हाेती. दोन तासात संगमेश्वर आणि देवरुख या दोन्ही मार्गावर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा महाकाय वटवृक्ष जेसीबी चालक पिंट्या चव्हाण यांनी बाजूला केला.