मंडणगड तालुक्यात ७३०६ गणेशभक्त दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:36 IST2021-09-15T04:36:42+5:302021-09-15T04:36:42+5:30
मंडणगड : गणेशोत्सवासाठी तालुक्यात ७,३०६ गणेशभक्त दाखल झाले असल्याची माहिती तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या ...

मंडणगड तालुक्यात ७३०६ गणेशभक्त दाखल
मंडणगड : गणेशोत्सवासाठी तालुक्यात ७,३०६ गणेशभक्त दाखल झाले असल्याची माहिती तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी वाडी व ग्राम कृती दलाच्या माध्यमातून तालुक्यात गणेशोत्सवासाठी आलेल्यांची आकडेवारी गोळा केली आहे. ५ ते १३ सप्टेंबर २०२१ या कालावधीत आरोग्य विभाग व पोलीस तपास नाक्याची अनुपस्थिती खटकणारी असताना नगर पंचायत व ग्रामपंचायतीही याबाबतीत फारशा आग्रही नसल्याचे दिसून आले.
या कालावधीत तालुक्यातील गावागावात ७,३०६ चाकरमाने दाखल झाले आहेत. यातील ३,८४७ जणांनी कोरोना दोन्ही डोसचे लसीकरण करून घेतले आहे. उत्सवासाठी आलेल्या लोकांपैकी २,७५३ जणांची कोरोना तपासणी बाकी आहे. यापैकी ७७८ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली असून, त्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. असे असले तरी तालुक्यातील खासगी रुग्णालयांत बाह्यरुग्ण तपासणी नेहमीपेक्षा अधिक असल्याचे दिसत आहे.
................
आरोग्य रामभरोसे
तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागातील कर्मचारी वैद्यकीय अधिकारी व सोयीसुविधांची वानवा लक्षात घेता तालुक्याचे आरोग्य रामभरोसे असल्याची भावना तालुकावासीयांमध्ये निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात येथील तालुका वैद्यकीय अधिकारी निवृत्त झाले. याचबरोबर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांची बदली झाली. गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यातील एकमेव कोविड रुग्णालयाचा कारभार ते सांभाळत होते. सध्या तालुका वैद्यकीय अधिकारी नियुक्त झाले असले तरी कोविड व ग्रामीण रुग्णालयासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा आहे.
अहवाल विलंबानेच
आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल विलंबाने येण्याची समस्या अद्यापही सुरूच आहे. चिपळूणमधून हे अहवाल मिळण्याची व्यवस्था करून देण्यात आली होती. मात्र, अजूनही अहवाल मिळण्यास उशीर होत असल्याने उपचार सुरू करायलाही विलंब होत आहे.