पाणी समस्येवर आता ५३ कोटींचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2015 01:15 IST2015-06-03T01:12:58+5:302015-06-03T01:15:34+5:30

रत्नागिरी पालिका : शीळ, पानवल धरणावर मुख्य भिस्त

53 Crore Transcript of Water Problems | पाणी समस्येवर आता ५३ कोटींचा उतारा

पाणी समस्येवर आता ५३ कोटींचा उतारा

रत्नागिरी : शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या पूर्णत: कायापालट होणार आहे. त्यासाठी शासनाच्या नगरोत्थान योजनेंतर्गत ५३.५३ कोटी रुपयांचे ‘वॉटर सोल्यूशन’ तयार करण्यात आले आहे. शीळ धरण व पानवल धरणावर आधारित हा प्रकल्प असून येत्या १५ दिवसात त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार आहे. त्यासाठी नगर परिषदेच्या आजच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.
रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा योजना गेल्या काही वर्षांपासून खिळखिळी झाली आहे. रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी भगदाडे पडल्याने हजारो लीटर पाणी वाया जात आहे. नगर परिषदेची पाणी वितरण व्यवस्था बाद झाली असून या योजनेचा पूर्णत: कायापालट करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यानुसार शीळ धरणाच्या जॅकवेलपासून साळवी स्टॉप जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची १५ इंची जलवाहिनी बदलून तेथे १८ इंची जलवाहिनी उभारली जाणार आहे. त्यासाठी १६ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रस्ताव मंगळवारी पार पडलेल्या रत्नागिरी पालिकेच्या सभेत मांडण्यात आला.
शहरात आदमपूर, माळनाका, खडपमोहल्ला आणि पंधरामाड या चार ठिकाणी मोठ्या साठवण टाक्या उभारल्या जाणार आहेत. शहरातील ९५ किलोमीटर लांबीची २ इंची वितरण वाहिनी बदलून तेथे तीन ते चार इंची वितरण वाहिनी उभारली जाणार आहे.
या नव्या योजनेनुसार, आधीच्या जलवाहिनीवरुन थेटपणे देण्यात आलेल्या ५८ जोडण्या तोडल्या जाणार आहेत. पानवल ते नाचणे जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंतची जलवाहिनी नवीन उभारली जाणार आहे. तेथील जलशुद्धीकरण केंद्राचाही विस्तार होणार आहे.
रत्नागिरी शहरात एक लाख लोकसंख्येसाठी २२ दशलक्ष लिटर दररोज लागणारे पाणी या योजनेत निश्चित करण्यात आले असून दरडोई १३५ लिटर पाणी दिले जाणार आहे. सध्याच्या योजनेनुसार शीळवरुन सर्वाधिक ११ ते १२ एमएलडी पाणी उचलले जात आहे.
उर्वरित २ किंवा ३ एमएलडी पाणी हे पानवल धरण, एमआयडीसी व नाचणे तलावातून उचलले जात आहे. पानवल धरण संपूर्णपणे नव्याने उभारले जाणार आहे. धरणापासून नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी नव्याने उभारली जाणार आहे. त्याबाबतची कार्यवाही पाटबंधारे विभागामार्फत सुरु आहे. त्यामुळे नवीन योजनेत पानवल धरणात शीळ धरणाइतके महत्वाचे स्थान देण्यात येणार आहे.
जून ते डिसेंबर या कालावधीत पानवल धरणातून १६ एमएलडी पाणी शहरासाठी उचलले जाईल. त्याचवेळी शीळ धरणातून सहा एमएलडी पाण्याची उचल केली जाईल. जानेवारी ते मे अखेरपर्यंत शीळ धरणातून १६ एमएलडी पाणी तर उर्वरित पाणी पानवल धरणातून उचलले जाणार आहे. एमआयडीसीकडून सध्या घेतले जाणारे पाणी पूर्णत: बंद केले जाणार आहे. या संपूर्ण योजनेची तपशिलवार माहिती सभागृहात उपस्थित महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे अभियंता मुल्ला यांनी दिली.
त्यानंतर लवकरात लवकर या योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यास सभागृहाने मंजूरी दिली. हा विषय सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आला. पाणी विषयावरील या चर्चेत नगरसेवक उमेश शेट्ये, बंड्या साळवी, भैय्या मलुष्टे, मिलींद कीर, अशोक मयेकर, बाळू साळवी, मधुकर घोसाळे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)


जलमापक बंधनकारक
या योजनेनुसार शहरातील प्रत्येक नळजोडणीसाठी पाणी मापक बसविणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे. जर जलमापक (वॉटर मिटर) अचानक बंद पडले तर पर्यायी पाणीमापक नगर परिषदेकडून तात्पुरत्या स्वरुपात पुरविला जाईल. दुरुस्तीनंतर संबंधित जोडणीधारकाने पुन्हा जलमापक बसविणे आवश्यक आहे, असेही या योजनेचे स्वरुप आहे.

Web Title: 53 Crore Transcript of Water Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.