नववी, अकरावीचे ४० हजार ३०५ विद्यार्थी वरच्या वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:34 IST2021-04-09T04:34:01+5:302021-04-09T04:34:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाने पहिली ते आठवीपर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय ...

40 thousand 305 students of ninth and eleventh class in upper class | नववी, अकरावीचे ४० हजार ३०५ विद्यार्थी वरच्या वर्गात

नववी, अकरावीचे ४० हजार ३०५ विद्यार्थी वरच्या वर्गात

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाने पहिली ते आठवीपर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५८४ शाळांमधील ४० हजार ३०५ विद्यार्थ्यांना ‘वरच्या वर्गात’ ढकलण्यात आले आहे.

गतवर्षी कोरोनामुळे दि. १५ मार्चपासून शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. कोरोना रुग्ण वाढल्यामुळे सुरक्षिततेसाठी परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दहावीचा एक पेपर रद्द करून मुलांना एकूण निकालावरून गुणांकन देण्यात आले होते. जूनमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले, मात्र कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करणे अशक्य असल्यामुळे ऑनलाइन अध्यापन सुरू झाले. नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. त्यानंतर जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग पालकांच्या संमतीने सुरू झाले. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग मात्र अद्याप ऑनलाइन सुरू होते.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक सुरू झाल्याने शासनाला अखेर शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. वास्तविक एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा सुरू होतात. काही शाळांच्या परीक्षा सुरूही झाल्या होत्या. शनिवार दि. ३ एप्रिल रोजी अखेर शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थी पास करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता दि. ७ एप्रिल रोजी नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या नववीच्या ४३२ शाळांमधील २२ हजार ५७९ व बारावीचे १५२ कनिष्ठ महाविद्यालयातील १७ हजार ७२६ विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा न देता सलग दोन वर्ष पास करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा झाला असला तरी प्रत्यक्ष या मुलांचे नुकसान झाले आहे.

..........................

दरवर्षी परीक्षा न घेता मुलांना पास करण्यापेक्षा मोजक्या अभ्यासक्रमावर तरी परीक्षा घेणे आवश्यक होते. मुलांना अभ्यास करून परीक्षा देण्याची सवय मोडल्यामुळे पाठांतर, आकलन, इतकेच नव्हे तर लेखनाची सराव संपला आहे. मुले आळशी झाली आहेत.

- गिरजा पाटील, पालक

.................

कोरोनामुळे पहिल्या सत्रातील परीक्षा जर ऑनलाइन घेण्यात आल्या होत्या. तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा रद्द करण्याचे कारण काय? परीक्षा रद्द करून मुलांचे नुकसान झाले आहे. मुलांचे भविष्य मात्र धोक्यात आले आहे.

- प्रतीक्षा रामाणे, पालक

तालुकानिहाय नववी व अकरावीच्या शाळा व पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे

तालुका शाळा विद्यार्थी

मंडणगड ३१ १४००

दापोली ६९ ४०२५

खेड ७३ ५२४३

चिपळूण १०० ८०७२

गुहागर ३८ २५९४

संगमेश्वर ६५ ४२६१

रत्नागिरी ८२ ८५५१

लांजा ३५ २३९८

राजापूर ७१ ३७६१

एकूण ५८४ ४०३०५

Web Title: 40 thousand 305 students of ninth and eleventh class in upper class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.