ऑनलाइन कर्ज देण्याच्या बहाण्याने २ लाख ३७ हजार लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST2021-04-10T04:30:59+5:302021-04-10T04:30:59+5:30
खेड : ऑनलाइन कर्ज देण्याचा बहाणा करून खेड तालुक्यातील वेरळ येथील एका व्यक्तीच्या बँक अकाउंटमधील २ लाख ...

ऑनलाइन कर्ज देण्याच्या बहाण्याने २ लाख ३७ हजार लुबाडले
खेड : ऑनलाइन कर्ज देण्याचा बहाणा करून खेड तालुक्यातील वेरळ येथील एका व्यक्तीच्या बँक अकाउंटमधील २ लाख ३७ हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका अज्ञात इसमावर गुरुवारी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर महादेव बडे (३६, वेरळ, ता. खेड) यांनी याबाबत खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. बडे यांच्या मोबाइलवर अज्ञात इसमाचा फोन आला. ऑनलाइन कर्ज करून देतो, असे सांगून त्याने बडे यांचा विश्वास संपादन केला. पुढील कार्यवाहीसाठी त्यांच्याकडून बँक खात्याचा आयडी आणि पासवर्ड मागितला. कसलाही विचार न करता बडे यांनी त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्याचा योनो ॲपचा पासवर्ड आणि आयडी दिला. त्यानंतर दिनांक ७ रोजी सायंकाळी संबंधित अज्ञात इसमाने त्यांच्या अकाउंटमधील टप्प्याटप्प्याने तब्बल २ लाख ३७ हजार रुपये परस्पर काढून घेतले.
कोणालाही कर्ज हवे असल्यास संबंधित बँकेच्या प्रत्यक्ष शाखेत जाऊन आपली कागदपत्रे व माहिती द्यावी. कोणतीही बँक ऑनलाइन कर्ज देत नाही. कोणाचाही असा कॉल आल्यास त्यांना आपल्या बँक खात्यासंबंधित कसलीही माहिती देऊ नये, अशा प्रकारे फसवणाऱ्या व्यक्तींकडून सावध राहावे, असे आवाहन खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव आणि या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी केले आहे.