‘रत्नागिरी गॅस’विरोधात १६ कामगारांचे उपोषण सुरु
By Admin | Updated: March 24, 2015 00:11 IST2015-03-23T23:39:40+5:302015-03-24T00:11:29+5:30
साखळी आंदोलन : वेतनाचा प्रश्न ऐरणीवर

‘रत्नागिरी गॅस’विरोधात १६ कामगारांचे उपोषण सुरु
गुहागर : रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील सी अॅण्ड एम फायनान्स विभागात काम करणाऱ्या १६ कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सोमवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली.रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील सिंग एंटरप्रायझेसमध्ये हे १६ कामगार गेली सहा वर्षे काम करत होते. लेबर अॅक्टनुसार या कामगारांना वेतन मिळत नसल्याने संबंधित कंत्राटदाराकडे रितसर मागणी करुनही दाद दिली जात नसल्याने अखेर कामगार आयुक्तांकडे धाव घेतली. याचा परिणाम कंपनी प्रशासनावर होऊन अन्य कंत्राटी कामगारांनाही या कायद्याप्रमाणे वेतन देणे भाग पडले. याचा राग मनात धरुन या १६ कामगारांना कंपनीने कंत्राट संपल्यानंतर या कामगारांचे नवीन गेटपास न काढता ‘काही दिवसांनी तुम्हाला बोलावण्यात येईल’, असे सांगितले.या दरम्यान के. डेनियल या नवीन कंत्राटदाराला हे कंत्राट मिळूनही समीर भोसले नामक स्थानिक कंत्राटदाराला फक्त दोनच महिन्याचे कंत्राट देऊन नवीन कामगार भरतीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. यामुळे या कामगारांमध्ये संताप व्यक्त होऊन अखेर कंपनी गेटसमोर साखळी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. या उपोषणासाठी लोकहक्क समिती व अंजनवेल ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. सकाळपासून १६ कामगारांनी प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडल्यानंतरही सोमवारी सायंकाळीपर्यंत प्रकल्पातील एकही अधिकारी फिरकला नाही. तहसीलदार वैशाली पाटील व पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी उपोषणस्थळी जाऊन कामगारांशी चर्चा केली.या १६ कामगारांसह लोकहक्क समितीचे यशवंत बाईत, विठ्ठल भालेकर, आत्माराम मोरे, श्रीकांत धामणस्कर, राजेश धामणस्कर यासह २५० ग्रामस्थ सहभागी झाले होते.कामगारांचे साखळी उपोषण होणार हे निश्चित झाल्याने अधिकारी रविशंकर कौल व कंत्राटी विभागाचे प्रमुख पाटील हे अचानकपणे जाणीवपूर्वक रजेवर गेल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले की, कामगारांशी चर्चा केल्यानंतर कंपनीचे असिस्टंट सरव्यवस्थापक रविशंकर कौल यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नसल्याचे सांगितले.