Of the 140 patients in the women's hospital, only 28 staff; | महिला रुग्णालयातील १४० रुग्णांची मदार केवळ २८ कर्मचाऱ्यांवर;

महिला रुग्णालयातील १४० रुग्णांची मदार केवळ २८ कर्मचाऱ्यांवर;

रत्नागिरी : येथील जिल्हा महिला रुग्णालयात सध्या कोरोना रुग्णांसाठी १४० खाटांची सोय आहे. सध्या हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने भरलेले असून या रुग्णांची सेवा केवळ २८ कर्मचारी करीत आहेत. स्वत:च्या आरोग्याचा धोका पत्करून हे कर्मचारी रात्रं-दिवस या रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांना अंघोळ घालणे, जेवण भरविणे, अगदी डायपर बदलणे ही कामे अगदी आनंदाने करीत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. आधीच आरोग्य यंत्रणेत डाॅक्टर आणि कर्मचारी यांची संख्या अपुरी आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेलाही सुरुवात झाली आहे. या मोहिमेत दोन वेळा लसीकरण करण्यात येत आहे. ही धावपळ सुरू असतानाच शिमगोत्सवात आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचा संसर्ग जलदगतीने वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढू लागली असून लोक तपासणीसाठी पुढे येत नसल्याने आरोग्य विभागाने शर्थीचे प्रयत्न करूनही कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे कोरोना परिस्थिती हाताळताना आरोग्य यंत्रणेच्या नाकीनऊ येत आहेत.

गेल्या ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागताच अपुरे बांधकाम असलेल्या महिला रुग्णालयात तातडीने कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आले. मुळात जिल्हा रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ असतानाही, कोरोना युद्धजन्य परिस्थितीतही अपुऱ्या कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा देत, या रुग्णालयाचे नाव उंचावले. शिमगोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढू लागल्याने या रुग्णालयात आता खाटांची संख्या १४० करण्यात आली आहे. मात्र, या रुग्णालयात डाॅक्टर्स, परिचारिका यांची संख्या अपुरी आहे. असे असतानाही येथील कर्मचारी रुग्णांना अंघोळ घालणे, त्यांना भरविणे, त्यांची बेडशीट बदलणे अगदी डायपर बदलणे ही कामे त्यांच्या अगदी संपर्कात राहून करीत आहेत.

सध्या या रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, सेवा देणाऱ्या डाॅक्टर्स आणि परिचारिकांची संख्या अपुरी पडत आहे. या रुग्णालयाला स्वतंत्र फिजिशियन, भूलतज्ज्ञ यांची स्वतंत्र गरज आहे. मात्र, सध्या जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरच ही सेवा देत आहेत.

अतिदक्षता विभागात २० खाटा आहेत. प्रत्येक रुग्णासाठी एक परिचारिका असणे अत्यावश्यक आहे. मात्र, सध्या या कक्षात ११ परिचारिका ही जबाबदारी सांभाळत आहेत. ऑक्सिजन कक्षात ६६, तर अलगीकरण कक्षात ५४ खाटा आहेत. या दोन्ही कक्षात तीन रुग्णांमागे एका परिचारिकेची गरज असते. मात्र, या दोन्हींसाठी केवळ १७ परिचारिका कार्यरत आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळावर या रुग्णालयाची सेवा रात्रं-दिवस सुरू आहे.

चौकट

रुग्णांच्या नातेवाईकांकडून या कर्मचाऱ्यांना सहकार्य होते. मात्र, काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून या कर्मचाऱ्यांना मनस्ताप दिला जातो. या रुग्णालय आवारात अस्वच्छता केली जाते. त्यामुळे काही वेळा या कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्यासारखे वाटते. मात्र, काहींच्या नातेवाईकांकडून कृतज्ञता व्यक्त करून त्यांना सन्मानही दिला जातो. त्यामुळे नव्या उभारीने हे कर्मचारी पुन्हा रुग्णसेवेत व्यग्र होतात.

Web Title: Of the 140 patients in the women's hospital, only 28 staff;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.