दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धवसेनेकडे एकमेव असणाऱ्या दापोली नगरपंचायतीमधील १४ नगरसेवकांनी शुक्रवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता नगरपंचायतीत शिंदेसेनेचा नगराध्यक्ष विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.काही दिवसांपूर्वी उद्धवसेनेतील १४ नगरसेवकांनी पक्षाला साेडचिठ्ठी देत स्वतंत्र गट स्थापन केला हाेता. या नगरसेवकांनी शुक्रवारी गृहराज्यमंत्री याेगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे मंत्री याेगेश कदम आणि रामदास कदम यांनी पक्षात स्वागत केले.दापोली शहरातील विकासकामे होत नसल्याने मंत्री योगेश कदम यांच्यावर विश्वास ठेवून आपण शिंदेसेनेत पक्षप्रवेश केला आहे. मंत्री योगेश कदम यांनी विकासकामांचा तालुक्यात झपाटा लावला आहे. दापोली शहराचा विकास व्हावा याच हेतूने आपण उद्धवसेनेला सोडचिठ्ठी दिल्याचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी सांगितले.
दापाेली शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहाेत. शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांचा भ्रमनिरास हाेणार नाही. - याेगेश कदम, गृहराज्यमंत्री.