श्रमदानातून १३० वनराई बंधारे
By Admin | Updated: October 6, 2015 23:41 IST2015-10-06T22:01:10+5:302015-10-06T23:41:28+5:30
पाणी टंचाईवर उपाय : महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान

श्रमदानातून १३० वनराई बंधारे
रहिम दलाल-- रत्नागिरी -‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या धर्तीवर महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गावोगावी लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची हजारो कामे सुरु असून, सुमारे २०० बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये विद्यार्थी, स्थानिक रहिवासी श्रमदानासाठी पुढे सरसावल्याने जिल्हा परिषद कृषी विभाग अधिक जोमाने उतरला आहे. जिल्ह्यात चालू वर्षात उन्हाळ्यामध्ये जूनच्या पंधरवड्यामध्ये ९८ गावांतील २२७ वाड्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्यात येत होते. त्यामध्येही विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. त्याचे चांगले परिणाम उन्हाळ्यामध्ये दिसून येत होते. मात्र, मागील वर्षामध्ये लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम बंद करण्यात आले होते. यंदा पावसाचे प्रमाण आणि दरवर्षी जिल्ह्यात उद्भवणारी पाणीटंचाई याचा विचार करता येत्या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात सुमारे १० हजार वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान ५ ते ६ बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
पावसाळा संपल्याने आता ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे आदींमध्ये वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे. यासाठी प्लास्टिक पिशव्या, दगड, माती आदींचा वापर करण्यात येत आहे. हे अभियान राबवण्यासाठी तालुक्याचे सर्व प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी गावांमध्ये जाऊन पाणी अडवण्याबाबत जनजागृती करत आहेत. तसेच ते बंधाऱ्यांच्या बांधकामामध्ये सहभागी होत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ठिकठिकाणच्या गावांमध्ये सुमारे १३० वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे जाहीर केले. त्याचवेळी त्यांनी स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, जनता आणि खासगी कंपन्यांना सहकार्याचे आवाहनही केले होते. त्याला प्रतिसाद देत जयगड येथील जिंदल कंपनीने १ लाख प्लास्टिकच्या पिशव्या बंधाऱ्यांसाठी मोफत दिल्या आहेत. गावोगावी बांधल्या जाणाऱ्या बंधाऱ्यांमुळे पाणी टंचाईवर मात करणे काही अंशी शक्य होणार आहे.
त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.
तालुका बांधलेले वनराई
बंधारे
मंडणगड०६
दापोली५५
खेड००
चिपळूण१३
गुहागर०६
संगमेश्वर००
रत्नागिरी०४
लांजा१६
राजापूर३०
एकूण१३०