राजस्थानातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील अजमेर, बुंदी, पुष्कर, सवाई माधोपूर आणि पाली यांसारख्या शहरांमध्ये परिस्थिती फारच वाईट असल्याचे बोलले जात आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (एसडीआरएफ) मुसळधार पावसामुळे प्रभावित अजमेर जिल्ह्यातील १७६ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अजमेरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ख्वाजा गरीब नवाजच्या दर्ग्यासह शहराच्या इतर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. दर्ग्याभोवतीच्या रस्त्यांवर पाण्याचा जोरदार प्रवाह दिसून आला. मुसळधार पावसात, दर्ग्याच्या निजाम गेटच्या बाहेर एक तरुण तोल गेल्याने वेगाने वाहणाऱ्या पाण्यात पडला आणि वाहू लागला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पाण्याच्या प्रवाहात वाहणाऱ्या या तरुणाला तेथील दुकानदारांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दरम्यान, हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने त्या तरुणाचा हात धरून त्याला किनाऱ्यावर खेचले. यामुळे तरुणाचा जीव वाचला आणि एक दुःखद घटना टळली.
एसडीआरएफ कमांडंट राजेंद्र सिंह सिसोदिया म्हणाले, १८ जुलै रोजी सायंकाळी अजमेर पोलिस नियंत्रण कक्षाला मुसळधार पावसामुळे शहरातील विविध वसाहतींमध्ये लोक अडकल्याची माहिती मिळाली. पथकाने परिस्थितीची माहिती घेतली असता, शहरातील सर्व तलाव ओव्हफ्लो झाल्याचे आढळून आले. शहरातील सुभाष नगर कॉलनी, सागर विहार, वन विहार कॉलनी, इदगाह कॉलनी, वैशाली नगर, आम तालब, गुलाब बारी यासारख्या भागात तीन ते चार फूट पाणी भरले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक अडकले होते.
एसडीआरएफ पथकाने १८ जुलैच्या रात्रीपासून १९ जुलैच्या संध्याकाळपर्यंत अजमेर शहरातील विविध वसाहतींमध्ये अडकलेल्या एकूण १७६ नागरिकांना वाचवले आहे. पथक अजूनही पूर्णपणे सज्ज आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २० जुलैपासून राजस्थानात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, २७-२८ जुलैच्या सुमारास पूर्व राजस्थानमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.