राजस्थानमधील उदयपूर येथे हिरण मगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने मगरीच्या हल्ल्यापासून आपल्या मुलीचे प्राण वाचवताना स्वत:चा जीव गमावला. ही महिला तलावाच्या काठावर कपडे धूत असतान मगरीने तिच्या मुलीवर हल्ला केला. मात्र तिला वाचवताना ही महिला मगरीच्या तावडीत सापडली. मगरीने या महिलेला पाण्यामध्ये खेचून नेले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार झामर कोटडा येथील पारोला गावातील महिला सकाळी मुलीसोबत जंगलात बकऱ्यांना चरायला घेऊन गेली होती. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ती तलावाच्या काठावर कपडे धूत होती. त्यावेळी पाण्यातून एक मोठी मगर बाहेर आली आणि तिने या महिलेच्या मुलीवर हल्ला केला. त्यावेळी या महिलेने प्रसंगावधान राखत मुलीला मगरीच्या तावडीतून खेचले आणि दूर ढकलले. मात्र या झटापटीत ही महिला मगरीच्या तावडीत सापडली. त्यानंतर या महिलेने तिच्यावर हल्ला करत पाण्यात खेचून नेल्याने या महिलेचा मृत्यू झाला.
दरम्यान, या महिलेच्या मुलीने भीतीने आरडाओरडा सुरू केल्याने आजूबाजूला असलेले ग्रामस्थ तिथे धावले. त्यानंतर पोलिसांना आणि सिव्हिल डिफेन्स टीमला माहिती दिली गेली. मग सुमारे दीड तास शोधाशोध केल्यानंतर महिलेचा मृतदेह तलावात सापडला. या महिचेलं नाव पेमी नाथूलालच्या रूपात झाली आहे. मगरीने हल्ला केल्याने या महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न झालेला होता.