अलिबाग : महिलांबाबत बेताल वक्तव्य करून सर्वच महिलावर्गाचा रोष ओढवणाऱ्या भाजपाचे आमदार राम कदम यांच्याविरोधात रायगड महिला काँग्रेस चांगल्याच आक्र मक झाल्या. कदम यांच्या फोटोला जोडे मारून, पायदळी तुडवून तसेच त्यांचा फोटोही संतप्त महिलांनी जाळला. यावेळी महिलांनी अलिबाग भाजपा कार्यालयासमोर कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.एखाद्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी जाहीर कार्यक्रमात अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणे अशोभनीय व निंदनीय आहे व त्याचा आम्ही महिला, समस्त जनता जाहीर निषेध करत असल्याचे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांनी सांगितले.भाजपाचे आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमातील बेताल वक्तव्य करून समस्त स्त्री वर्गाचा अवमान केला आहे. अशा आमदारांना पाठीशी घालणाºया सरकारचा देखील निषेध करण्यात येत आहे. राम कदम यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याकरिता त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्रातील तमाम महिला शक्ती राम कदमांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी मापगावच्या सरपंच शैला नाईक, माजी नगरसेविका कविता ठाकूर, भूमिका थळे, अलिबाग तालुकाध्यक्ष योगेश मगर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांनी आपल्या तीव्र भावना अत्यंत स्पष्टपणे मांडल्या.
राम कदम यांच्याविरोधात महिलांचे निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:46 IST