खैरे धरणातील लाखो लिटर पाणी वापराविना
By Admin | Updated: April 29, 2017 01:43 IST2017-04-29T01:43:56+5:302017-04-29T01:43:56+5:30
महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यात खैरे धरण आहे. सुमारे १.७९१ द.ल.घ. मी. पाणीसाठा असणाऱ्या या धरणातून पसिरातील गावांना

खैरे धरणातील लाखो लिटर पाणी वापराविना
सिकंदर अनवारे / दासगाव
महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यात खैरे धरण आहे. सुमारे १.७९१ द.ल.घ. मी. पाणीसाठा असणाऱ्या या धरणातून पसिरातील गावांना पाणीपुरवठा केल्यानंतरही लाखो लिटर पाणी वापराविना धरणात शिल्लक राहत आहे. या पाण्याचा वापर टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा योजनेमार्फत केल्यास महाड तालुक्यातील दासगाव वहूरसह इतर चार गावे आणि महाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकतो. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ या घोषवाक्याप्रमाणे सध्या महाडकरांची परिस्थिती झाली आहे.
महाड तालुक्याच्या पश्चिमेला रत्नागिरी जिल्ह्यातून येणाऱ्या डोंगराच्या उतारालगत खैरे धरण आहे. १९९३ साली लघुपाटबंधारे विभागामार्फत या धरणाची निर्मिती करण्यात आली. डोंगरातील नैसर्गिक खड्ड्यांमध्ये स्थानिक ओढ्यांचे पाणी अडवून या धरणाची निर्मिती करण्यात आली. कृषी सिंचन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून उभारण्यात आलेल्या या धरणाचा वापर पाणीपुरवठ्यासाठी केला जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रतिदिवस ५ लाख लिटर पाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारून खाडीपट्ट्यातील १९ गावे आणि ३० वाड्यांना हा पाणीपुरवठा केला जातो. बारमाही ५ लाख लिटर पाणीउपसा असूनदेखील आतापर्यंत धरणाचा कधीच तळ दिसलेला नाही. महाड शहर आणि दासगाव वहूरसह इतर ४ गावांना कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा होतो. दहा महिने मुबलक पाणी देणाऱ्या या कोथुर्डे धरणातील पाणीपुरवठा शेवटच्या दोन महिन्यांत अडचणीत येतो. पाणीसाठा अपुरा असल्याने दासगाव वहूरसह इतर ४ गावांचा पाणीपुरवठा थांबतो. तर महाड नगरपालिका धरणातील मृतसाठ्यातील पाणी पंपाद्वारे उपसा करून शहराला पाणीपुरवठा करते. ग्रामीण भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असताना शहरात पाणीकपात टँकरद्वादे पाणीपुरवठा अशा योजना आखाव्या लागतात. नगरपालिकेला खूप मोठ्या प्रामाणात आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. या पाणीटंचाईवर अद्याप कोणताच ठोस उपाय महाड शहर अगर ग्रामीण भागाला मिळालेला नाही. खैरे धरणातील ववापरात न येणारे लाखो लिटर पाणी जर टंचाई काळात शहर आणि दासगाव वहूरसह इतर केंबुर्ली, साहीलनगर, गंधारपाले, मोहप्रे या चार गावांसाठी उपलब्ध करून दिल्यास दोन महिन्यांच्या या पाणीटंचाईवर मार्ग निघू शकतो.
खैरे धरणातून होणारा पाणीपुरवठा दासगाव गावालगत असलेल्या कोसबी गावापर्यंत आलेला आहे. कोसबी ते दासगाव अंतर साधारणपणे ३ कि.मी. इतके आहे. या दरम्यान पाइपलाइन टाकली गेली तर खैरे धरणातील हे पाणी पुढे दासगाव वहूरसह इतर ४ गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरले जाऊ शकते. त्याचप्रमाणे महाड शहराला पाणीपुरवठा करणारे शुद्धीकरण प्रकल्प किंजलघर (दादली) हद्दीत आहे. किंजलघर ते कोसबी हे अंतर देखील १० कि.मी.पेक्षा कमी आहे. त्यामुळे खैरे धरणाचा किमान टंचाई काळात पाण्याचा वापर होणे अशक्य नाही.
खैरे धरणातून १९ गावे आणि ३० वाड्यांसाठी दर दिवशी ५ लाख लिटर पाण्याचा उपसा होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात उपसा होऊन देखील धरणाच्या पाण्याची पातळी कधी खाली गेलेली नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात असणारे हे पाणी पडीक असते तर लगत असलेल्या ग्रामीण आणि शहरी भागात पाण्याची गंभीर समस्या असते. याचा विचार करून शहर आणि महामार्ग लगत ६ गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविणे गरजेचे आहे.