माथेरान मिनी ट्रेन सुरू होण्याच्या मुहूर्ताला यंदाही ग्रहण ? दिवाळीपूर्वी फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 07:51 IST2025-09-15T07:51:15+5:302025-09-15T07:51:15+5:30
माथेरान पर्यटननगरीचे मुख्य आकर्षण असलेले मिनी ट्रेन सफारी पर्यटकांकरिता एक मेजवानी असते. या ट्रेनने नागमोडी वळणे व डोंगर रांगांमधून प्रवास करण्याकरता देश-विदेशातून अनेक पर्यटक माथेरानमध्ये दाखल होतात.

माथेरान मिनी ट्रेन सुरू होण्याच्या मुहूर्ताला यंदाही ग्रहण ? दिवाळीपूर्वी फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी
मुकुंद रांजणे
माथेरान : पर्यटकांचे आकर्षण व माथेरानची खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी समजली जाणारी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन या वर्षी १५ ऑक्टोबरचा मुहूर्त साधणार का? की यंदाही काही कारणांनी मुहूर्त टळणार? या चर्चेला सध्या उधाण आले आहे. मागील काही वर्षांमध्ये मिनी ट्रेन सुरू करण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे या वर्षी तरी मिनी ट्रेन वेळेवर सुरू होईल का, अशी शंका स्थानिकांकडून उपस्थित करीत आहेत.
पर्यटकांकरिता मेजवानी
माथेरान पर्यटननगरीचे मुख्य आकर्षण असलेले मिनी ट्रेन सफारी पर्यटकांकरिता एक मेजवानी असते. या ट्रेनने नागमोडी वळणे व डोंगर रांगांमधून प्रवास करण्याकरता देश-विदेशातून अनेक पर्यटक माथेरानमध्ये दाखल होतात.
नेरळ - माथेरान मिनी ट्रेन पावसाळ्यात बंद ठेवण्यात येते. परंतु यावेळी अमन लॉज ते माथेरान शटल सेवा नियमित सुरू असते. पर्यटकांना खरे आकर्षण हे नेरळ-माथेरान या सफारीमध्येच वाटत असल्याने यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी होत असते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
बोगी उपलब्ध नसल्याचे उघड
काही वर्षांपूर्वी माथेरानमध्ये नेरळहून मिनी ट्रेनच्या पाच फेऱ्या सुरू होत्या. पण, यावेळेस फक्त दोनच फेऱ्या सुरू केल्या होत्या. लवकरच त्या वाढविण्यात येतील, असे सांगितले होते. मात्र, मार्गावर धावण्याकरिता बोगी उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून, ऑक्टोबर महिन्यापूर्वी नवीन बोगी या सेवेत सामील होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दुरुस्तीअभावी प्रवासी कोच भंगारात
प्रवासी वर्गाचे फक्त चार कोच लावून या मार्गांवर तीन ट्रेनपेक्षा जास्त ट्रेन चालू शकत नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे अनेक प्रवासीवर्गाचे कोचेस नादुरुस्त झाल्याने ते मध्य रेल्वेने भंगारात काढले आहेत.
याबाबत मध्य रेल्वेच्या आणि केंद्रीय रेल्वे मंत्री, खासदार अप्पा बारणे यांना निवेदन देऊन नेरळ माथेरान ट्रेनकरिता प्रवासी वर्गाचे डबे आणि मालगाडी बोगी नवीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी सांगितले.