धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच आगामी निवडणुका लढविणार - तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 23:41 IST2018-10-21T23:41:08+5:302018-10-21T23:41:14+5:30
धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आगामी लोकसभेत रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच निवडणुका लढवायच्या आहेत

धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच आगामी निवडणुका लढविणार - तटकरे
रेवदंडा : धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आगामी लोकसभेत रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच निवडणुका लढवायच्या आहेत, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी चौल येथे काढले.
चौल नाका येथे अलिबाग तालुका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी तटकरे बोलत होते. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भडकल्या असून रोजगार निर्मितीचे भारतीय जनता पक्षाने दिलेले आश्वासन फसवे ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले.
रायगडचे खासदार केंद्रीय मंत्री असून एकही उद्योग या जिल्ह्यात आणला नाही, ही मंत्रिपदाची शोकांतिका आहे. मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झाली असताना सरकार गांभीर्याने दखल घेत नाही असे सांगून गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने शेतीचे, मच्छीमारांचे केलेले नुकसानाबाबत राज्य सरकार काही बोलत नाही. नजीकच्या काळात ग्रामपंचायत निवडणुका आहेत. त्यामुळे मित्रपक्षांना सोबत घेऊन विजय संपादन करण्याचा सल्ला तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
मेळाव्यात तालुक्यातील काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर काही कार्यकर्त्यांना पदावर नियुक्ती करण्याची पत्र वाटप करण्यात आले. कार्यक्र माला पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष निगडे, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी, मांडवा ते रेवदंडा परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज धुमाळ यांनी केले तर सूत्रसंचालन हेमंत खरसंबले व आसिफ किरकिरे यांनी केले.