जाना था महड, पहुँच गए महाड! गुगल मॅपचा घेतला आधार, स्पेलिंगमुळे झाला डोक्याला ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:16 IST2025-01-08T10:16:08+5:302025-01-08T10:16:57+5:30
‘जाना था जापान पहुँच गए चीन...’ हे गाणे अनेकांनी ऐकले असेलच. असाच प्रकार रायगड जिल्ह्यातील महडकडे निघालेल्या अनेक प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

जाना था महड, पहुँच गए महाड! गुगल मॅपचा घेतला आधार, स्पेलिंगमुळे झाला डोक्याला ताप
लोकमत न्यूज नेटवर्क, महाड : ‘जाना था जापान पहुँच गए चीन...’ हे गाणे अनेकांनी ऐकले असेलच. असाच प्रकार रायगड जिल्ह्यातील महडकडे निघालेल्या अनेक प्रवाशांना सहन करावा लागत आहे. महाड आणि महड या दोन्ही ठिकाणांच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये साधर्म्य असल्याने महड येथे निघालेले अनेक भाविक महडपासून सुमारे १०० किलोमीटर दूर असलेल्या महाडमध्ये पोहोचतात आणि डोक्याला हात लावतात. गुगल मॅपचा आधार घेऊन प्रवास करणारे हे भाविक असतात.
अष्टविनायकांपैकी महड येथे गणेश मंदिर असून, येथे दर्शनासाठी अनेक जण गुगल मॅपचा आधार घेऊन प्रवास करतात. त्यावेळी ते महाड शहरात पोहोचतात. अशा वेळी ते वरद विनायक गणेश मंदिर कुठे आहे, असा प्रश्न स्थानिकांना विचारतात. महाड शहरातदेखील छोटी छोटी गणेश मंदिरे आहेत. वरदविनायक मंदिर नसल्याने हे भाविक महडऐवजी महाड येथे आल्याचे त्यांच्या लक्षात येते. अशावेळी ते त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. रस्ता चुकलेल्या अनेक प्रवासी महाड तालुक्यातील रायगड किल्ला, गांधार पाले लेणी पाहून पुढचा प्रवास करतात, तर काही जण या साधर्म्य स्पेलिंगमुळे झालेल्या अधिक प्रवासामुळे डोक्याला हात मारून घेतात.