टँकरचे पाणी विहिरीत ओतून आदिवासींना पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:26 IST2019-06-07T00:26:23+5:302019-06-07T00:26:35+5:30
नंदकुमार भावसार यांचे सहकार्य : मोरेवाडी-ताडवाडी ग्रामस्थांसाठी सतत १३ वर्षे उपक्रम

टँकरचे पाणी विहिरीत ओतून आदिवासींना पाणीपुरवठा
कर्जत : तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ताडवाडी-मोरेवाडी या गावातील आदिवासी लोकांना नंदकुमार भावसार हे फार्महाउसचे मालक गेली १३ वर्षे उन्हाळ्यात पिण्याचे पाणी पुरवीत आहेत. आपल्या फार्महाउससाठी बांधलेली विहीर उन्हाळ्यात तळ गाठते. त्या वेळी टँकरचे पाणी ओतून फार्महाउसबरोबर दोन्ही वाडीतील लोकांना देखील पाणी पुरवित आहेत.
पाथरज ग्रामपंचायत हद्दीत ताडवाडी आणि मोरेवाडी, पाथरज या गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. त्यातील पाथरज गाव हे डोंगरपाडा पाझर तलावाजवळ असल्याने त्यांची नळपाणी योजना तयार झाली आणि पाथराज गावातील महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबली आहे. त्यातच काही वर्षांपूर्वी डोंगरपाडा पाझर तलाव फुटल्याने परिसरातील तब्बल २५ गावे-वाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती. भीमाशंकर रस्त्यावर असलेल्या जागेत भीमाशंकर हिल्स नावाचे फार्म हाउस उभारणाऱ्या नंदकुमार भावसार यांनी आपल्या स्वत:साठी एक टँकर खरेदी केला. तो टँकर ताडवाडी येथून वंजारवाडी येथे पेज नदीवर जाऊन पाणी आणून विहिरीत ओतून लोकांची पाणी समस्या काही प्रमाणात सोडवायचे. भावसार यांच्या जमिनीत असलेल्या ३५ फूट खोलीच्या विहिरीतील पाणी मार्च महिन्यात तळ गाठते. त्या वेळी ते आपल्या मालकीच्या टँकरमधून दररोज दोन फेºया मारून पाणी आणून विहिरीत ओतण्याचे काम केले जाते. त्याचा परिणाम विहिरीत पिण्याचे पाणी सर्वांना उपलब्ध होते. त्यांचा हा उपक्रम गेली १३ वर्षे सुरू असून सर्व देखरेख पाथरज ग्रामपंचायत तंटामुक्त समितीवर सहा वर्षे अध्यक्ष म्हणून काम करणारे मोहन शिंगटे करत आहेत.
उन्हाळ्यात महसूल विभाग खासगी पाणी साठे हे परिसरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिग्रहण करीत असतात. भावसार यांनी आपल्या फार्म हाउसमध्ये असलेल्या विहिरीतील पाणी घेण्यासाठी ताडवाडी-मोरेवाडीमधील आदिवासी लोकांना येण्यासाठी कुंपण खुले ठेवले आहे. विहिरीजवळ पोहचण्यासाठी लाकडी शिडीदेखील बनविली आहे.त्याचा फायदा ५०० मीटर अंतरावर असलेल्या मोरेवाडी ग्रामस्थांना आणि ७०० मीटर अंतरावर असलेल्या ताडवाडी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विहिरीतून काढण्यासाठी होत असतो.
फार्महाउसमधील विहिरीत उन्हाळ्यात आटणारे पाणी आणि त्या विहिरीत दररोज दोन टँकर पाणी ओतणारे नंदकुमार भावसार यांच्या दातृत्वाबद्दल कौतुक आदिवासी भागात होत आहे. त्यांचा हा उपक्रम गेली १३ वर्षे सुरू असून कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी पाणीटंचाई काळात दररोज दोनपेक्षा अधिक टँकर विहिरीत ओतून आदिवासी लोकांना पाणी पुरवावे, अशी सूचना भावसार यांना लेखी पत्र पाठवून केली आहे.