पोलादपूरमधील देवळे धरणाला गळती, मुख्य साठ्यातून पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 02:13 AM2019-07-05T02:13:38+5:302019-07-05T02:14:05+5:30

पोलादपूर तालुक्यातील देवळे धरणाला गळती लागली आहे. धरणातील मुख्य विमोचकातून मोठ्या प्रमाणात पाणी उत्सर्जन सुरू आहे तर पिचिंगमधूनही काही ठिकाणी गळती होत आहे.

Water leakage from the main reservoir, leakage of Devale dam in Poladpur, | पोलादपूरमधील देवळे धरणाला गळती, मुख्य साठ्यातून पाण्याचा विसर्ग

पोलादपूरमधील देवळे धरणाला गळती, मुख्य साठ्यातून पाण्याचा विसर्ग

googlenewsNext

- प्रकाश कदम

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील देवळे धरणाला गळती लागली आहे. धरणातील मुख्य विमोचकातून मोठ्या प्रमाणात पाणी उत्सर्जन सुरू आहे तर पिचिंगमधूनही काही ठिकाणी गळती होत आहे. चिपळूण येथील तिवरे धरण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देवळे धरणक्षेत्रातील ग्रामस्थांवरही टांगती तलवार असून धरणाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
शासनाच्या जलसंधारण (लघु पाटबंधारे विभाग) विभागाकडून देवळे धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. १९८३ मध्ये धरणाच्या कामाला मंजुरी मिळाली. प्रत्यक्ष काम सुरु व्हायला १९९७ साल उजाडले, तर २००३ मध्ये धरणाचे काम पूर्णत्वास गेले. धरणाच्या बांधकामासाठी आजवर ४ कोटी ३५ लाख २२ हजार रुपये निधी खर्च झाला. २९ शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने आपल्या पिकत्या जमिनी धरणासाठी दिल्या.
गावात धरण झाले तर शेतीला बारमाही पाणी मिळेल गावात सुबत्ता येईल, गावकऱ्यांना नोकरी-व्यवसायासाठी मुंबई, पुणे, सुरत, बडोदा यासारख्या शहरात जावे लागणार नाही, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र धरणाचे काम पूर्ण होऊन जवळपास १५ वर्षे झाली आहेत. धरणाचा गावकºयांना काडीमात्र उपयोग झाला नाही.
निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे धरणाला पहिल्या वर्षीपासूनच मोठी गळती लागली. पावसाळ्यात ओसंडून वाहणारे धरण पावसाळ्यानंतर कोरडे पडण्यास सुरवात होते. देवळे येथील स्थानिक पदाधिकारी अनिल दळवी, किसन रिंगे, लक्ष्मण मोरे, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्यासह आमदार भरत गोगावले यांनी बुधवारी धरणाची पाहणी केली आणि गळतीचा आढावा घेतला. धरणाची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. धरणाच्या बांधावर झाडी वाढली असून मुख्य विमोचकातून मोठ्या प्रमाणात गळती आहेच, तसेच पिचिंगमधूनही गळती आहे. झाडांची मुळे खोलवर जाऊन धरणाला भेगा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे धरण धोकादायक बनले आहे. धरणाची वेळीच दुरुस्ती न केल्यास दुर्घटना होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवण्यात येत आहे.

अधिकाºयांकडून धरणाची पाहणी
देवळे धरणाला गळती लागल्याची माहिती मिळताच रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी तातडीने देवळे धरणाची पाहणी करण्याची सूचना प्रांताधिकारी व तहसीलदारांना देण्यात आल्या. त्यानुसार पोलादपूर तहसील कार्यालयाच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे,अव्वल कारकून सुसलादे, तलाठी खेडकर यांनी प्रत्यक्षात जाऊन धरणाची पाहणी केली. त्यांनी मुख्य विमोचकाची पाहणी करून पाणीगळती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मान्य केले, तसेच पिचिंगमधून चार ते पाच ठिकाणी पाणीगळती होत असल्याची पाहणी केली.
पंचायत समितीचे उपसभापती शैलेश सलागरे, लघुसिंचन पाटबंधारे विभाग माणगाव प्रभारी अधिकारी शेखर वडाळकर यांनीही अधिकाºयांसह देवळे धरणाला प्रत्यक्षात भेट दिली. यावेळी २०१३ रोजी धरणाच्या दुरुस्तीसंदर्भात पाठवलेला अंदाजपत्रकाला मान्यता मिळाली असली तरी निधी उपलब्ध नसल्याने काम सुरू झालेले नाही. मुख्य विमोचकातून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर आमदार भरतशेठ गोगावले यांनीही देवळे धरणाची पाहणी केली. लघुपाटबंधारे विभागाला दुरुस्तीसाठी सुधारित अंदाजपत्रक बनवून जलसंधारण मंत्री तानाजी सावंत त्यांच्याकडे बैठक बोलावून चर्चा करणार असल्याचे सांगितले.

देवळे धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. त्यामुळे त्याचा उपयोग शेतकºयांना, गावकºयांना होत नाही. तिवरे येथे घडलेल्या घटनेमुळे देवळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे त्यांनी धरणाची दुरुस्ती करा, अन्यथा धरण नष्ट करण्याची मागणी केलेली आहे. त्याचा पाठपुरावा जलसंधारण मंत्री यांच्याकडे करणार आहोत.
- भरत गोगावले, आमदार, महाड

सातत्याने पाठपुरावा करूनही लघुपाटबंधारे विभागाने धरणाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. जलसंधारण विभागातील उपविभागीय कार्यालयाकडूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
- चंद्रकांत कळंबे, माजी उपाध्यक्ष तथा राजिप सदस्य

देवळे धरण होऊन जवळपास १५ वर्षे झाली असून आम्हा ग्रामस्थांना त्याचा काहीच फायदा झालेला नाही. कारण धरणाला गळती लागली आहे. याबाबत शासनाकडे दुरुस्तीची मागणी केली आहे. तिवरे धरण घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी
- बबिता दळवी, सरपंच,
देवळे ग्रामपंचायत

Web Title: Water leakage from the main reservoir, leakage of Devale dam in Poladpur,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड