नागोठणे पोलीस ठाण्याची इमारत दुरु स्तीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: August 7, 2015 23:05 IST2015-08-07T23:05:49+5:302015-08-07T23:05:49+5:30
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या वास्तूच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या पोलीस वसाहतीचीही अशीच

नागोठणे पोलीस ठाण्याची इमारत दुरु स्तीच्या प्रतीक्षेत
नागोठणे : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या वास्तूच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या पोलीस वसाहतीचीही अशीच दुर्दशा झाली आहे. यामुळे पोलिसांना आपल्या कुटुंबासह दुसरीकडे भाड्याच्या जागेत राहावे लागत आहे. त्यामुळे बांधकाम खात्याला या इमारतीची दुरु स्ती करण्याचा मुहूर्त कधी सापडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येथील बंगलेआळीत ब्रिटिशकालीन बैठी चाळ वजा इमारत आहे. त्या काळात ब्रिटिश शासकीय कामासाठी या जागेचा उपयोग करीत असत व स्वातंत्र्यानंतर या जागेत पोलीस ठाण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर अनेक वर्षे पोलीस ठाण्याचा कारभार या जागेत चालत होेता.
चार वर्षांपूर्वी पोलीस ठाणे समोरच्या सरकारी जागेत हलविले, तरी पोलीस ठाण्याच्या विविध शाखांचे काम अद्याप जुन्या इमारतीमध्येच सुरू आहे. या बैठ्या चाळसदृश जागेत पुढील म्हणजे पश्चिम बाजूस पोलीस ठाण्याचा कारभार, तर पूर्व बाजूस पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दहा खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांनी इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असला तरी तो पुरेसा नसल्यामुळे काम चालू झाले नसल्याचे सांगितले. इमारतीची तातडीने दुरु स्ती करण्यासंदर्भात पोलीस ठाण्याच्या वतीने तसेच जिल्हा पोलीस मुख्यालयातून महाडच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे पत्रांद्वारे अनेकदा लक्ष वेधले असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
सध्या पोलिसांना नागोठणेत चढ्या भावाने घरभाड्याने राहावे लागत असून बांधकाम खात्याने यात जाणीवपूर्वक लक्ष घालून या जागेची दुरु स्ती केली तर या वास्तूला पुन्हा एकदा उजाळा येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)