Two roasted dies during treatment | माणगावमधील सिलिंडर स्फोट: भाजलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

माणगावमधील सिलिंडर स्फोट: भाजलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

माणगाव : विळेभागाड औद्योगिक परिसरामध्ये क्रिप्टझो क्रिप्टझो इंजिनीअरिंग प्रा. लि. या कारखान्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बॉयलर सिलिंडर स्फोटात भाजलेल्या १८ जखमींपैकी आशिष येरुणकर (रा. म्हसेवाडी), राकेश हळदे (रा. उंबर्डी) यांचा शनिवारी मृत्यू झाला. चौघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कारखान्यात आॅक्सिजन सिलिंडर बनविण्याच्या चाचणीवेळी स्फोट झाला.

कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांच्या सुरक्षेत हलगर्जी करण्यात आल्याप्रकरणी परिसरात ग्रामस्थांनी तसेच मृत कुटुुंबीयांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत कंपनी व्यवस्थापन व शासकीय अधिकारी नुकसानभरपाई जाहीर करणार नाहीत, तोपर्यंत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले. माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे आदींनी कंपनीला भेट दिली. कंपनी २०१५ पासून बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मशीन मेकिंग शॉपचे लायसन्स होते. मात्र, टेस्टिंगची परवानगी नव्हती.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
संतप्त ग्रामस्थांनी, कंपनी व्यवस्थापनासह संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी कामगारांना कंपनी व्यवस्थापन नुकसानभरपाई देण्याचे लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला. त्या वेळी माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर यांनी ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या संचालकांशी संपर्क झाला नसून कामगारांच्या हलगर्जीप्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय नुकसान भरपाईसाठीही पाठपुरावा करणार असून याबाबत रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून त्यांनीसुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे दिघावकर यांनी सांगितले. तर,रायगडचे कंपनी निरीक्षक अंकुश खराडे व केशव केंद्रे यांनी, कंपनीला मशीन मेकिंग शॉपचे लायसन्स देण्यात आले होते. मात्र, टेस्टिंगसाठी परवानगी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. कंपनीचे मालक व व्यवस्थापकीय मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्रिप्टझो इंजिनीअरिंग प्रा.लि. कंपनी या कंपनीला मेकिंग मशिनरीची परवानगी फेब्रुवारी २०१९ मध्ये दिली आहे. यात चालणारी सिलिंडर रिफिलिंगची प्रोसेस वैध असून, कंपनीत त्यांनी केलेली चाचणी अवैध आहे. या चाचणीकरिता कंपनीने आवश्यक परवानगी घेतली नव्हती.
- अंकुश खराडे, कंपनी निरीक्षक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, रायगड

Web Title: Two roasted dies during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.