दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे ठार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:57 IST2017-11-02T01:57:52+5:302017-11-02T01:57:59+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्हीही अपघातांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.

दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे ठार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील दुर्घटना
खोपोली/वावोशी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्हीही अपघातांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या किलोमीटर २७ या स्पॉटवर, एमएच ०४ डीवाय ७६४९ ही स्पार्क मेकची कार अत्यंत वेगाने रस्त्याच्या मधोमध असलेल्या गार्डनमध्ये घुसली आणि सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरियर्समध्ये अडकली.
तो वेग आणि बसलेला धक्का एवढा जबरदस्त होता की, त्यातील चालक दत्तात्रय सखाराम तावरे (८०, रा. ठाणे पश्चिम) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी मदत केली. खालापूर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे. या अपघाताची चौकशी खालापूरचे पोलीस निरीक्षक जमील शेख हे करीत आहेत.
दुसरा अपघात मंगळवारी घडला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी रात्री ११.३० वाजता हॉटेल फूडमॉलजवळ, पुण्याकडील बाजूस रस्त्याच्या मधोमध एका व्यक्तीचा अपघात झाल्याची माहिती खोपोली पोलीस ठाण्यात मिळताच, पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी आपल्या टीमसह तेथे धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती वेडसर असून, तिला महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिली व मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या अपघाताची बेवारस व्यक्तीचा ‘अज्ञात वाहनाच्या धडकेतून मृत्यू’ अशी खोपोली पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या घटनेत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी मोलाची मदत केली.