फुलपाखरू उद्यानाचे पर्यटकांना आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:15 IST2019-12-17T23:08:45+5:302019-12-17T23:15:09+5:30

८५ प्रजातींची नोंद : कर्नाळा अभयारण्यातील पर्यटकांची गर्दी

Tourist attraction of the butterfly park | फुलपाखरू उद्यानाचे पर्यटकांना आकर्षण

फुलपाखरू उद्यानाचे पर्यटकांना आकर्षण

अरुणकुमार मेहत्रे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : कर्नाळा पक्षी अभयारण्यात तयार करण्यात आलेले फुलपाखरू उद्यान सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीचे फुलपाखरांचे मनमोहक दर्शन घडत असल्याने पर्यटकांनी गर्दी केली आहे. त्याचबरोबर मनमोहक फुलपाखरांचे निरीक्षण करण्यासाठी पक्षिपे्रमी आवर्जून भेट देत आहेत. आतापर्यंत उद्यानात ८५ प्रजातीच्या फुलपाखरांची नोंद झाल आहे.


‘छान किती दिसते, फुलपाखरू...’ हे गाणे सर्वांच्याच परिचयाचे आहे. मात्र, शहरीकरण, वाढत्या औद्योगिकीकरणामुळे फुलपाखरे दिसेनाशी झाली आहेत. मात्र, पनवेलपासून काही अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्यातील उद्यान सध्या रंगबिरंगी फुलपाखरांनी खुलले असून, पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे.


कर्नाळा पक्षी अभयारण्यात वर्षभर विविध रंगी, स्थलांतरित पक्ष्यांचे थवे नजरेस पडतात. अभयारण्य उंच खिंडीत असल्याने या ठिकाणी निरामय शांतता त्याचबरोबर गारवा मिळतो. त्यामुळे सुट्टीच्या हंगामात प्रामुख्याने हिवाळ्यात पर्यटकांसह पक्षिनिरीक्षक, हौशी पक्षिप्रेमी, गिर्यारोहक मोठ्या संख्येने येतात. वन्यजीव विभाग ठाणे यांच्या वतीने परिसरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या सोयी-सुविधांसाठी निधी खर्च करण्यात आला आहे.


वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात येत आहेत. फुलपाखरू उद्यान हा त्याचाच एक भाग होय. कर्नाळा किल्ल्यावर जाताना बालोद्यानाच्या बाजूला बटरफ्लाय गार्डन उभारण्यात आले आहे. फुलपाखरांना आकर्षित करणारी अनेक झाडे लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर त्यांना आश्रय देणारी आणि मध देणारी रोपे असे दोन घटक या ठिकाणी आहेत. ज्यावर मादी फुलपाखरू अंडी देतात आणि जेव्हा सुरवंट अंडीमधून बाहेर पडतात, तेव्हा ते आश्रय देणाऱ्या वनस्पतीची पाने खातात. मध देणाºया वनस्पती या फुले असणाºया आहेत. कर्नाळा पक्षी अभयारण्यात वर्षभर ११४ प्रजातीची फुलपाखरे येत असल्याचे पक्षिनिरीक्षकांचे म्हणणे आहे. यापैकी पाच ते सहा प्रजातीची फुलपाखरे उद्यानात कायम दिसून येतात.


उद्यानात जाण्यास पर्यटकांना मनाई असली तरी बाहेरून त्यांची मनमोहक छबी पर्यटकांना पाहता येत आहे.


विविध प्रजातींची फुलपाखरू
अभयारण्यात जवळपास ११४ प्रजातींची फुलपाखरे येतात. त्यापैकी कॉमन क्रो, कॉमन माईन, कॉमन स्पॉटड प्लेट, गोल्डन इंजल, प्लूम जुडे, तालीड जय त्याचबरोबर ब्लू मार्नन राज्य फुलपाखरू मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. यंदा आता कुठे कर्नाळा अभयारण्यात फुलपाखरांचे आगमन होऊ लागले आहे. १५ जानेवारीनंतर विविध प्रजातींची आणखी फुलपाखरे पाहायला मिळतील, असा विश्वास वनपरिक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Tourist attraction of the butterfly park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.