‘भाजपाला धडा शिकवा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:19 IST2019-01-25T00:19:19+5:302019-01-25T00:19:28+5:30
भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाही धोक्यात येईल. घटना बदलून मतदानाचा हक्कदेखील हिरावून घेतला जाईल.

‘भाजपाला धडा शिकवा’
अलिबाग : भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाही धोक्यात येईल. घटना बदलून मतदानाचा हक्कदेखील हिरावून घेतला जाईल. त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा काँगे्रस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले.
भाजपा सरकारने गेल्या साडेचार वर्षांमध्ये फक्त घोषणांचा पाऊस पाडला आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. मात्र, सरकार उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने काढलेली जनसंघर्ष यात्रा बुधवारी अलिबागमध्ये दाखल झाली. बॅ. अंतुले भवन येथे झालेल्या कार्यक्रमात चव्हाण बोलत होते.
शिवसेना आणि भाजपाचा संसार म्हणजे बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा आहे, अशी खिल्ली चव्हाण यांनी उडवली. काँग्रेसशासित राज्याने सत्तेवर येताच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र, महाराष्ट्रातील देवेंद्र सरकारचा अभ्यास अजूनही सुरूच आहे. देशातील आणि राज्यातील वाहणाºया वाºयांनी आता दिशा बदलली आहे. त्यामुळे या पुढे काँग्रेसचीच लाट येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी बी. एम. संदीप, सचिन सावंत, भाई जगताप, माणिक जगताप, माजी आमदार मधुकर ठाकूर, रूपाली सावंत, श्रद्धा ठाकूर, राजा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपा ज्या रामनामाचा जप करते, तो त्यांचा खरा राम नाही. त्यांचा खरा राम हा नथुराम गोडसेच आहे, असा घणाघाती हल्ला माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. देशातील आणि राज्यातील जनता भाजपाला मते देऊन फसली आहे. आता जनता सावध झाली असून आगामी निवडणुकीत भाजपाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.