नवी मुंबई- खेळण्याकरिता बाहेर गेलेल्या दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिला कामोठे येथील आपल्या श्रीसाई लेडिज टेलर या दुकानात बोलावून लैंगिक छळ केल्याचे सबळ पुराव्याअंती सिद्ध झाल्याने कामोठे (नवी मुंबई) येथील टेलर रियाज इब्राहीम सय्यद यास येथील जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अंजना सावंत यांनी दोषी ठरवून तीन वर्ष सश्रम कारावास, पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा बुधवारी सुनावली आहे.सन 2015 मध्ये घडलेल्या या घटनेबाबत पीडित मुलाच्या आईने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी तपास करून भा.दं.वि.कलम 376(आय), 506 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोक्सो) अन्वये गुन्हा दाखल करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अंजना सावंत यांच्या समोर झाली. शासकीय अभियोक्ता अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी सुनावणीदरम्यान एकूण सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. फिर्यादी आणि पीडित मुलीची साक्ष न्यायालयात महत्वपूर्ण ठरली. दरम्यान सन 2015 मध्ये आरोपी टेलर रियाज इब्राहिम सय्यद यास अटक केल्यापासून तो कारागृहातच होता, अशी माहिती शासकीय अभियोक्ता अॅड. बांदिवडेकर-पाटील यांनी दिली.
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळप्रकरणी नवी मुंबईतील टेलर रियाज सय्यदला तीन वर्ष सश्रम कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 19:58 IST