रायगड जिल्ह्यात दीड लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 23:38 IST2020-09-25T23:38:02+5:302020-09-25T23:38:09+5:30
पालकमंत्री आदिती तटकरे यांची माहिती : मुख्यमंत्र्यांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा

रायगड जिल्ह्यात दीड लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. आतापर्यंत या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ६४ हजार ३२९ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच या मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार करताना, काही अडचण असल्यास कोरोना टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी. ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील, याकडे लक्ष द्यावे. प्रचार प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावेत, कोरोना दक्षता समित्या कार्यरत राहतील, याकडे लक्ष द्यावे, माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत एकाच समान बोधचिन्हाचा वापर सर्वत्र करावा, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या बाबींचे नियमित पालन करावे आणि नागरिकांच्या सहभागाने महाराष्ट्र सदृढ बनविण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राहावे, अशा सूचना दिल्या.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्ह्यात एकूण १ हजार ५०० पथके नेमली आहेत. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान २ बेड राखीव ठेवून कोविड कॉर्नर निर्माण करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील आॅक्सिजन बेड वाढविण्यासाठी, तसेच
जवळपास १२० व्हेटिंलेटर्स उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कोविड १९ मधून बरे झालेल्या रुग्णांच्या इतरांना प्रोत्साहन व बळ मिळेल, अशा मुलाखती प्रसारमाध्यमांद्वारे सर्वत्र
प्रसिद्ध केल्या जाणार आहेत असे
स्पष्ट केले.
याप्रसंगी, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.
साडेसात लाख घरांच्या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यात एकूण ७ लाख ७५ हजार २२५ घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. आजपर्यत १ लाख ६४ हजार ३२९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण पथकाला आरोग्य सुरक्षाविषयक सर्व प्रकारची आवश्यक साधनसामुग्री पुरविण्यात आली आहेत, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.
आरोग्य केंद्रांना सक्षम करणे गरजेचे
प्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास मृत्युदराचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असे सांगून हे सर्वेक्षण सर्वांसाठी आहे. या भावनेने लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागान ही मोहीम जिल्ह्यात सर्वस्तरावर यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.