नागोठणे : येथील नेल्सन मंडेला निवासी आश्रमशाळेतील माध्यमिक विभागाची मान्यता रद्द करण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थी मात्र या निर्णयाने पुन्हा एकदा वाऱ्यावर आले आहेत. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक गव्हाणे यांनी हा निर्णय शनिवारी वृत्तपत्रांमध्येच मी वाचला असून आम्हाला अद्यापि तसे पत्र आले नसल्याचे सांगितले. नागसेन एज्युकेशन सोसायटी अॅण्ड बुद्धिस्ट कल्चरल ट्रस्ट, मुंबई संचलित नेल्सन मंडेला निवासी आश्रमशाळा अनेक वर्षे येथे कार्यरत आहे. आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाबाबत चौदा त्रुटी आढळून आल्याने २० जून २०१३ रोजी शासनाच्या आदेशान्वये या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन या त्रुटींची पूर्तता करण्याच्या अटींवर गतवर्षी जून २०१४ ला ही शाळा पुन्हा चालू करण्यात आली होती. या शाळेत पहिलीपासून दहावीपर्यंतचे वर्ग असून सध्या एकशे पंधरा विद्यार्थी शिकत आहेत व त्यासाठी नऊ शिक्षक कार्यरत आहेत. या वर्षीचे शैक्षणिक वर्ष चालू झाल्यानंतर साधारणत: पावणेदोन महिन्यांनी माध्यमिक शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय शुक्र वारी जाहीर करण्यात आला आहे. २०१३ नंतर असा प्रकार पुन्हा एकदा घडल्याने माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळांचा रस्ता पकडण्याची वेळ आली आहे. या आश्रमशाळेत शिकणारे सर्वच विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातीलच असल्याने माध्यमिक विभागाच्या बंदीमुळे मुलांच्या भावी शिक्षणाचा प्रश्न पालकवर्गासमोर उभा राहिला आहे. यामुळे आपल्या पाल्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल, अशी भीती पालकांना वाटत आहे. (वार्ताहर)
आश्रमशाळेतील विद्यार्थी वाऱ्यावर
By admin | Updated: August 8, 2015 21:58 IST