मुख्य रस्त्यांवर पाणी फवारणी
By Admin | Updated: May 10, 2017 00:22 IST2017-05-10T00:22:07+5:302017-05-10T00:22:07+5:30
येथील महात्मा गांधी मार्ग या मुख्य रस्त्यावरील धुळीच्या साम्राज्याला स्थानिक वैतागले आहेत. याच रस्त्यावरून पहाटे पाच

मुख्य रस्त्यांवर पाणी फवारणी
लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : येथील महात्मा गांधी मार्ग या मुख्य रस्त्यावरील धुळीच्या साम्राज्याला स्थानिक वैतागले आहेत. याच रस्त्यावरून पहाटे पाच वाजल्यापासूनच पर्यटकांसह, घोड्यांची रहदारी नियमितपणे असते. पहाटे सफाई कर्मचाऱ्यांमार्फत रस्त्यांवर झाड़ू मारला जातो. परंतु मातीचे रस्ते असल्यामुळे धूळ उडत असते. त्यामुळे मॉर्निंग वॉकला नियमित जाणाऱ्या स्थानिकांना तसेच पर्यटकांना पहाटेच धुळीला सामोरे जावे लागते. यासाठी उपाय म्हणून नगरपरिषदेच्या माध्यमातून मंगळवारपासून महात्मा गांधी मार्गावर सकाळी सात वाजल्यापासून टपालपेटी नाका ते रिगल हॉटेलपर्यंतच्या रहदारीच्या ठिकाणी अग्निशामक गाडीचा उपयोग करून पाणी फवारणीचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतलेले आहे.
सर्वत्र मोठ्या प्रमाणात धूळ उडून दुकानदारांच्या सामानावर धुळीचे थरावर थर साठत आहेत. दुकानातील वस्तू जुन्याच वाटत आहेत, तर पर्यटक आणि स्थानिक मंडळींच्या नाका, तोंडात काही ग्रॅम धूळ नियमितपणे जात असल्याने दुर्धर आजार होण्याची संभावना दिसत आहे. दुकानातील जुन्याच वाटणाऱ्या वस्तू पर्यटक घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. या धुळीपायी नाहक आर्थिक भुर्दंड व्यापारी वर्गाला सोसावा लागत आहे. परिणामी याच रस्त्याच्या दोन्ही बाजूला खाद्यगृहे असल्याने सहसा या खाद्यगृहात शिरण्यास पर्यटक धजावत नाहीत. यासाठी नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटातील गटनेते प्रसाद सावंत यांनी संबंधित विभागाला दिलेल्या सूचनेनुसार अभियंत्यांनी धुळीचा त्रास कमी करण्यासाठी रस्त्यावर पाण्याची फवारणी करण्यास सुरुवात के ली आहे. यामुळे धूळ कमी होऊन पर्यटकांना होणारा त्रास कमी होणार आहे.त्यासाठी येथील वॉकर टंक (बालदी) येथून पाण्याचा उपसा केला जात आहे.
काहीअंशी का होईना यामुळे धुळीचे प्रमाण कमी झालेले दिसत असल्यामुळे व्यापारी वर्गातून नगरपरिषदेच्या या स्तुत्य उपक्र माचे कौतुक होत आहे.