सोनोग्राफी कक्ष बंद, गरोदर मातांची परवड; रायगड जिल्हा रुग्णालयाचे करायचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 06:14 AM2022-12-10T06:14:39+5:302022-12-10T06:14:53+5:30

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ही सेवा बाहेरील तज्ज्ञांमार्फत सुरू असल्याचा दावा केला आहे; मात्र ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने रुग्णालयातील या कक्षास भेट दिली असता तो बंद असल्याचे दिसून आले.

Sonography room closed, pregnant mothers afford; What to do with Raigad District Hospital? | सोनोग्राफी कक्ष बंद, गरोदर मातांची परवड; रायगड जिल्हा रुग्णालयाचे करायचे काय?

सोनोग्राफी कक्ष बंद, गरोदर मातांची परवड; रायगड जिल्हा रुग्णालयाचे करायचे काय?

googlenewsNext

अलिबाग : कोरोनानंतर रायगडच्या जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा बळकट केल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत असला तरी रोज जिल्हा रुग्णालयात विविध कक्षांत समस्या उद्भवत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे बंद असलेली सीटीस्कॅन यंत्रणा कशीबशी सुरू झाली. आता गेल्या पंधरा दिवसांपासून सोनोग्राफी कक्ष डॉक्टरविना बंद आहे. यामुळे विशेषत: गरोदर मातांची मोठी गैरसोय होत आहे.

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ही सेवा बाहेरील तज्ज्ञांमार्फत सुरू असल्याचा दावा केला आहे; मात्र ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने रुग्णालयातील या कक्षास भेट दिली असता तो बंद असल्याचे दिसून आले. खासगी डॉक्टरांनाही तात्पुरत्या सेवेसाठी आवश्यक असलेली कागदोपत्री पूर्तता करण्यात आलेली नाही. 

या रुग्णालयात डॉ. सुहास ढेकणे हे रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत होते. ढेकणे यांना बढतीवर पुणे येथे नियुक्ती मिळाली आहे; परंतु तरीही त्यांनी रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांना नवीन रेडिओलॉजिस्ट येईपर्यंत सेवा देतो, असे सांगितले होते. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉ. ढेकणे यांना कार्यमुक्त केले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सोनोग्राफी कक्ष रेडिओलॉजिस्टविना बंद आहे.

आरोग्यमंत्र्यांना कधी आणणार ? 
जिल्हा शासकीय रुग्णालयाची आंतररुग्ण इमारत ही जीर्ण झाली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनीही रुग्णालयाच्या समस्येबाबत आरोग्यमंत्र्यांना अलिबागमध्ये आणून पाहणी करू, असे सांगितले होते. मात्र, महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात ना पालकमंत्री आले, ना आरोग्यमंत्री. पालकमंत्री आरोग्यमंत्र्यांना कधी आणणार? असा प्रश्न रायगडकर विचारत आहेत.

खासगीत चौपट खर्च
त्यामुळे बाहेरून येणाऱ्या, तसेच आंतररुग्णांना खासगी केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, खासगी सोनोग्राफी केंद्रात शासकीय रुग्णालयापेक्षा चौपट पैसे भरावे लागत आहेत. नवीन रेडिओलॉजिस्ट रुजू होत नाही तोपर्यंत रुग्णांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.

गरोदर मातांचे हाल
गरोदर माता, तसेच पोटाचे व इतर आजार असणाऱ्या रुग्णांची सोनोग्राफीमार्फत तपासणी करून त्याद्वारे डॉक्टर उपचार करतात. रोज किमान चार ते पाच गरोदर महिला प्रसूतीसाठी दाखल होतात, तर कक्षात चाळीस ते पन्नास गरोदर महिला उपचार घेत असतात. 

रेडिओलॉजिस्ट डॉ. सुहास ढेकणे यांची बदली झाली आहे. तात्पुरते बाहेरील तज्ज्ञ येऊन रुग्णांना तपासत आहोत. गरोदर मातांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय होत नाही. -डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय

Web Title: Sonography room closed, pregnant mothers afford; What to do with Raigad District Hospital?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.