Shrivardhan's fisherman's outcry, from municipal to tahsil office | श्रीवर्धनमध्ये मच्छीमारांचा आक्रोश, नगरपालिका ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा
श्रीवर्धनमध्ये मच्छीमारांचा आक्रोश, नगरपालिका ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा

श्रीवर्धन : या वर्षी पाऊस प्रचंड प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर दुसरीकडे समुद्रात वादळी वारे निर्माण झाल्याने मासेमारी व्यवसाय धोक्यात आला. त्याचे दूरगामी परिणाम रायगड जिल्ह्यातील मासेमारी करणाºया लोकांच्या जीवनावर झाले आहेत.

यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतक-याला एकरी मदत देण्यात आली आहे; त्याच धर्तीवर मासेमारी करणाऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी श्रीवर्धनमधील मासेमारी करणाºयांनी केली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता श्रीवर्धन तालुक्यातील कोळी समाजाने नगरपालिका ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढत श्रीवर्धन तालुक्यात मत्स्य दुष्काळ जाहीर करावा असे फलक घेऊन शासन दरबारी आपला आक्रोश व्यक्त केला. या पदयात्रेत तालुक्यातील कोळी समाजातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

डिझेल सबसिडी मिळावी, शेतक-यांप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, उपजीविकेचे दुसरे साधन उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी कोळी समाजाच्या विविध नेत्यांनी समाजाला संबोधित करताना व्यक्त केली. श्रीवर्धन कुणबी समाज सभागृहात तालुक्यातील सर्व मच्छीमार संघटनानी पत्रकारांशी संवाद साधत आपल्या व्यथा व्यक्त मांडल्या. तहसीलदार सचिन गोसावी यांना सर्व मासेमारी करणाºयांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दुपारी १ च्या सुमारास दिले. त्यापूर्वी श्रीवर्धन शिवसेना कार्यकारिणीने ११ वाजता मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याबाबत निवेदन सादर केले. शिवसेनेकडून तालुकाप्रमुख प्रतोष कोलथरकर, सुयोग लांगी, जुनेद दुस्ते, नगरसेवक प्रीतम श्रीवर्धनकर व कोळी समाज आणि मासळी व्यावसायिकांच्या वतीने रामचंद्र वाघे, दिनेश चोगले, यशवंत चौलकर, इम्तियाज कोळपे, हरिदास वाघे, नंदू रघुवीर, भास्कर चौलकर, सायब हंमदुल्ले यांनी निवेदन दिले.

वादळाने मच्छीमारांचे नुकसान
गेल्या दोन वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. पावसाळ्यात बोटीची डागडुजी व नवनिर्मिती केली जाते. साधारणत: बोटीच्या आकारानुसार ५० हजारांपासून ते २ लाखांपर्यंतचा खर्च बोट निर्मितीसाठी येतो. मासेमारी करण्यासाठी जाळे प्रत्येक वर्षी नवीन बनवले जाते किंवा जुन्या जाळ्याची खर्च करून दुरुस्ती केली जाते. बोटींवर काम करणाºया खलाशांना आगाऊ रक्कम दिली जाते. या वर्षी आलेल्या ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळांनी मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या जनसामान्यांचे उपजीविकेचे साधन हिरावून घेतले आहे. खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासे मिळत नाहीत; पूर्वी ५ वावापर्यंत जाऊन मासे मिळत होते, आता १२ वावाच्या पुढे जाऊनसुद्धा मासे मिळत नाहीत, असे चंद्रकांत वाघे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

या वर्षी मासळी मिळत नसल्याने कोळी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. मासेमारी हा कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. सरकारने मत्स्य दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे .
- भारत चोगले,
व्यावसायिक, श्रीवर्धन

क्यार, महा वादळामुळे तसेच सतत बदलणाºया हवामानामुळे मच्छीमारांचे नुकसान होत आहेत. कोळी समाजाने त्यांची ही व्यथा, अडचण निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. हे निवेदन तत्काळ वरिष्ठ पातळीवर पाठवले जाईल.
- सचिन गोसावी,
तहसीलदार, श्रीवर्धन

Web Title: Shrivardhan's fisherman's outcry, from municipal to tahsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.