Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:23 IST2025-12-21T14:08:20+5:302025-12-21T14:23:00+5:30
श्रीवर्धन नगरपालिकेत जनतेने नगराध्यक्षपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला पसंती दिली. परंतु याठिकाणी जिंकून आलेले उमेदवार नगराध्यक्ष अतुल चौगुले हे शिंदेसेनेत जाणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
रायगड - नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचे निकाल आज घोषित झाले आहे. त्यात श्रीवर्धन नगरपालिकेत उद्धवसेनेचे अतुल चौगुले नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले आहेत. श्रीवर्धन नगरपालिकेवर गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र यावेळी श्रीवर्धन नगरपालिकेतील चित्र बदलले आहे. या निवडणुकीत विजयी झालेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतुल चौगुले मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे निकालानंतर लगेच शिंदेसेनेने उद्धवसेनेला धक्का दिला.
श्रीवर्धन नगरपालिकेत जनतेने नगराध्यक्षपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला पसंती दिली. परंतु याठिकाणी जिंकून आलेले उमेदवार नगराध्यक्ष अतुल चौगुले हे शिंदेसेनेत जाणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. श्रीवर्धन नगरपालिकेतील राजकीय समीकरणे पाहता अतुल चौगुले यांनी विकासाच्या दृष्टीने सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. निकाल लागल्यानंतर काही तास उरकत नाही तोवर अतुल चौगुले यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. रायगड जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांमध्येच संघर्ष असल्याचे निवडणुकीत दिसून आले. याठिकाणी भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात सामना होता.
श्रीवर्धन हा सुनील तटकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याठिकाणी नगराध्यक्षपदी ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार निवडून आल्याने इथल्या मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी हा धक्का होता. परंतु आता इथले समीकरण बदलले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगुले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र सातनाक यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर ठाकरे गटाचे विजयी नगराध्यक्ष अतुल चौगुले यांनी भरत गोगावलेंसह सर्व पक्षाला श्रेय दिले आहे. अतुल चौगुले म्हणाले की, शिवसेनेत अंतर्गत काही नसते. शिवसैनिक एकच असतो. मग तो उद्धव ठाकरेंचा असो वा एकनाथ शिंदेंचा..शिवसैनिक रोखठोक असतो. माझ्या विजयात भरत गोगावले यांचाही सिंहाचा वाटा आहे.हा विजय दोन्ही शिवसेनेच्या जमिनीवरील कार्यकर्त्यांचा आहे. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची होती. पैशाचा महापूर आला होता. जनतेने पैशाला जुमावले नाही. १३ हजार जनतेचा मी ऋणी आहे. माझ्या विजयात दोन्ही शिवसेना, मनसे, शेकाप यांच्यासह अनेकांचा सहभाग होता. पक्षप्रवेशाबाबत काही बोलणी नाही. कुठल्याही अपेक्षेने गोगावले यांनी मदत केली नाही असं सांगत भविष्यात पक्षप्रवेश ठरवू असं म्हटलं.
दरम्यान, आमच्या शिवसेनेने पूर्ण ताकदीशी अतुलला जी मदत केली ती तो विसरू शकत नाही. पक्षप्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार. आम्ही गनिमी काव्याने जे युद्ध केले त्यात आमचा विजय झाला आहे. ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे.
उद्धवसेनेने दिला नकार, निव्वळ अफवा असल्याचा दावा
खासदार फुटणार, आमदार फुटणार, नगराध्यक्ष फुटणार अशा अफवा पसरवणे शिंदे गटाचे काम आहे. अतुल चौगुले यांना विजयी होऊन अर्धा तासही उलटला नाही, तोच ते शिंदेसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. माझे अतुल चौगुलेंशी बोलणे झाले आहे, असं होत नाही आणि होणारही नाही, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.