शिवराज्याभिषेक दिन सोहळाआज; किल्ले रायगडावर २२ मंडप, १०९ सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 08:59 IST2025-06-06T08:58:43+5:302025-06-06T08:59:04+5:30
जिल्हा प्रशासनाकडून विविध समित्या स्थापन

शिवराज्याभिषेक दिन सोहळाआज; किल्ले रायगडावर २२ मंडप, १०९ सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: शिवराज्याभिषेकला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने रायगडावर शुक्रवारी होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यासाठी गडावर २२ मंडप, १०९ सीसीटीव्ही कॅमेरे, १५ वैद्यकीय मदत केंद्रे आदी सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर येणार आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने विविध समित्या स्थापन केल्या आहेत.
प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी गडावर ५०० लिटरच्या ५० टाक्यांची सुविधा केली आहे. ८ आरओ लावण्यात आले आहेत. १ लाख पाण्याच्या बाटल्यांची सुविधाही आहे. गडावर २२ मंडपांची व्यवस्था केली असून, ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. रायगडपासून पाचाडपर्यंत १०९ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. १७ ठिकाणी ‘पब्लिक अलाऊंस सिस्टम’ असून सोहळा पाहण्यासाठी ९ एलईडी सुविधाही उपलब्ध केल्या आहेत. शिवप्रेमींच्या आरोग्याच्या दृष्टीने १५ वैद्यकीय केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
१०० बसची सुविधा
राज्यातून या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त आपली वाहने घेऊन येणार आहेत. त्यांच्यासाठी पार्किंगची सुविधा केली आहे. १२ ठिकाणी ही सुविधा आहे. पार्किंगपासून पाचाडपर्यंत जाण्यास राज्य परिवहनच्या १०० बसगाड्यांची सुविधा आहे.
दीड हजार सुरक्षा कर्मचारी तैनात
शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यासाठी १७० पोलिस अधिकारी, १२०० पोलिस कर्मचारी, ३५० होमगार्ड, १ एसआरपी प्लाटून असा १५०० पोलिस कर्मचारी-अधिकारी तैनात असणार आहे. १५० वॉकीटाकी उपलब्ध आहेत. रायगडावर कंट्रोल रूम बनविण्यात आली असून प्रत्येक विभागाचा पीआरओ या ठिकाणी असणार आहे. आपत्तीच्या अनुषंगाने पूर्ण तयारी केली आहे.
किल्ले रायगडावरील शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. हा सोहळा घरी बसूनही पाहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरबसल्या सोहळ्याचा आनंद लुटावा. शिवभक्तांनी नियमाचे पालन करून सोहळ्याचा आनंद लुटावा.
-किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड