रायगडमध्ये युतीमधील असंतोषाला यादीनंतर फुटले तोंड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 06:36 AM2019-10-02T06:36:26+5:302019-10-02T06:36:42+5:30

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये युतीविरोधात आघाडी अशा लढती पाहायला मिळणार आहेत.

Shiv sena & BJP News raigad | रायगडमध्ये युतीमधील असंतोषाला यादीनंतर फुटले तोंड

रायगडमध्ये युतीमधील असंतोषाला यादीनंतर फुटले तोंड

Next

- आविष्कार देसार्ई
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये युतीविरोधात आघाडी अशा लढती पाहायला मिळणार आहेत. शिवसेनेने अलिबाग, श्रीवर्धन, महाड, उरण आणि कर्जत या पाच विधानसभा मतदारसंघात, तर भाजपने पनवेल आणि पेण या दोन विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले.

शेकाप अलिबाग, पेण, पनवेल, उरण या मतदारसंघात आणि राष्ट्रवादी काँग्रेस श्रीवर्धन आणि कर्जतमध्ये लढणार आहे. काँग्रेस महाड, पेण आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघात लढतीसाठी सज्ज झाली आहे. मात्र युतीतील इच्छुकांची संख्या अधिक असल्याने यादी जाहीर होताच असंतोषाला तोंड फुटले आहे.

शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झालेली आहे. त्यांच्या आघाडीचा फायदा हा फक्त महाड विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांना होणार आहे. अलिबाग आणि पेण येथे काँग्रेस आणि शेकाप यांच्या मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्याविरोधात शेकापचे सुभाष पाटील यांची लढत होणार आहे. या ठिकाणी भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते हेही इच्छुक असल्यानेच त्यांनीही उमेदवारी अर्ज मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयातून घेतला आहे. त्या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर होते. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या युतीला ग्रहण लागण्याची शक्यता असल्याने शिवसेनेचे दळवी यांची धाकधूक वाढली आहे.
श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांचा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले अवधूत तटकरे यांना येथून संधी मिळेल, असा अंदाज होता. मात्र त्यांनी माघार घेतल्याचे दिसते. याच मतदारसंघामध्ये भाजपचे कृष्णा कोबनाक हेसुद्धा इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे उरण मतदारसंघातून महेश बालदी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल के लाआहे. या जागा शिवसेनेच्या वाट्याला गेलेल्या आहेत. त्यामुळे अ‍ॅड. महेश मोहिते, महेश बालदी आणि कृष्णा कोबनाक नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे शिवसेनेच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
महाड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांचा सामना काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांच्याशी होणार आहे. पेण विधानसभा मतदारसंघामध्ये शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांची लढत भाजपचे उमेदवार रवींद्र पाटील यांच्यासोबत होणार आहे.
पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात शेकापचे उमेदवार हरिश केणी यांच्यात लढत होणार आहे. उरणमधून शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्याविरोधात शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्यात चांगलीच लढत होणे अपेक्षित आहे.
कर्जत विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी माघार घेतल्याने कोणता उमेदवार द्यायचा याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अद्याप ठरलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची लढत ही शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांच्याशी होणार आहे. उमेदवारी अर्ज ४ आॅक्टोबरपर्यंत दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे दोन दिवसांत कोणता उमेदवार अर्ज दाखल करतो हे स्पष्ट होणार आहे.

नाराजीचे आव्हान
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप यांची युती होण्याबाबत स्पष्ट झाले नव्हते, त्यामुळे भाजपच्या काही इच्छुकांनी जोरदार तयारी केली होती. त्यामुळे त्यांची नाराजी शिवसेना कशी पचवणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Web Title: Shiv sena & BJP News raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.