खांडसई येथे भीषण पाणीटंचाईची समस्या
By Admin | Updated: May 14, 2017 22:54 IST2017-05-14T22:54:29+5:302017-05-14T22:54:29+5:30
सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर खुर्द या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या खांडसई गावातील ग्रामस्थांना गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सामना

खांडसई येथे भीषण पाणीटंचाईची समस्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पाली : सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर खुर्द या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या खांडसई गावातील ग्रामस्थांना गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत येथील ग्रामस्थांनी नुकतेच पाली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून लवकरात लवकर पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी के ली आहे.
खांडसई या गावात एकूण तीन विहिरी आहेत. तसेच २००९ मध्ये या गावासाठी स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना देखील कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून या सर्व विहिरी कोरड्या ठाक पडल्या असून येथील महिलांना दोन किलोमीटरवरून पायपीट करत डोक्यावरून पाणी आणवे लागत असल्याने महिला वर्गामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. तसेच या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन स्तरावरून येथे एकूण ११ ठिकाणी बोअरवेल मारल्या, परंतु एकाही ठिकाणी पाणी न लागल्याने लोकप्रतिनिधींसह शासन देखील हतबल झाले आहे.