रायगड प्रदक्षिणेत ७०० साहसवीर, चार वर्षांच्या मुलीसह ७० वर्षांच्या आजोबांनी घेतला सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 04:56 IST2018-12-24T04:56:20+5:302018-12-24T04:56:23+5:30
रायगड जिल्हा परिषद आणि युथ क्लब, महाडच्या विद्यमाने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रायगड प्रदक्षिणेला राज्यभरातील शिवप्रेमी आणि साहसवीरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रायगड प्रदक्षिणेत ७०० साहसवीर, चार वर्षांच्या मुलीसह ७० वर्षांच्या आजोबांनी घेतला सहभाग
महाड : रायगड जिल्हा परिषद आणि युथ क्लब, महाडच्या विद्यमाने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रायगड प्रदक्षिणेला राज्यभरातील शिवप्रेमी आणि साहसवीरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ७०० प्रदक्षिणार्थींमध्ये चार वर्षांच्या मुलीसह ७० वर्षांच्या आजोबांपर्यंतच्या आबालवृद्धांनीही सहभाग घेतला.
सकाळी ६.३० वाजता प्रदक्षिणार्थींचा पहिला चमू पाचाड येथून रवाना करण्यात आला. ७० ते ८० प्रदक्षिणार्थींचा एक चमू असे आठ चमू दर १५ मिनिटांच्या अंतराने सोडण्यात आले. डॉ. दिगंबर गीते यांनी केवळ दोन तासांमध्ये १७ किलोमीटरची अवघड प्रदक्षिणा पूर्ण केली. अनेक प्रदक्षिणार्थींनी साडेतीन ते चार तासांमध्ये हे अंतर पार केले.
रायगड प्रदक्षिणा मार्गावर अवघड चढ-उतार, चिंचोळ्या खिंडी, नदी-नाले यांचे आव्हान त्याचप्रमाणे रायगडचे भव्य रूप आणि निसर्ग या दरम्यान प्रक्षिणार्थींनी अनुभवला. या वेळी प्रदक्षिणार्थींना रायगड खोऱ्यातील वृक्षसंपदेची माहिती व्हावी, या उद्देशाने अनेक झाडांवर त्यांची स्थानिक नावे, शास्त्रीय नावे दर्शविणारे फलक लावले होते.
सकाळी ९ वाजता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी या प्रदक्षिणेत काही अंतरापर्यंत सहभाग घेऊन प्रदक्षिणार्थींचा हुरूप वाढविला.