सात वर्षांच्या शर्विकाने सर केला ‘दुर्ग लिंगाणा’; आतापर्यंत १२१ गडांना गवसणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 08:24 IST2025-01-28T08:00:01+5:302025-01-28T08:24:38+5:30
सर्व गोष्टींवर मात करत शर्विकाने ही मोहीम फत्ते केली आहे. या मोहिमेत तिच्यासोबत १६ गिर्यारोहकांचाही समावेश होता.

सात वर्षांच्या शर्विकाने सर केला ‘दुर्ग लिंगाणा’; आतापर्यंत १२१ गडांना गवसणी
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील सर्वात कठीण असलेला लिंगाणा दुर्ग अलिबागमधील शर्विका जितेन म्हात्रे या सातवर्षीय मुलीने सर केला आहे. आतापर्यंत शर्विकाने १२१ गडांना गवसणी घातली आहे.
सह्याद्री डोंगररांगेतील पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या दुर्गम वाटेवर असलेला हा दुर्ग स्वराज्याचे कारागृह म्हणूनही प्रसिद्ध आहे. या गडाच्या पायथ्याशी जाणारी वाटदेखील थरारक आहे. परंतु या सर्व गोष्टींवर मात करत शर्विकाने ही मोहीम फत्ते केली आहे. या मोहिमेत तिच्यासोबत १६ गिर्यारोहकांचाही समावेश होता.
या मोहिमेसाठी शर्विकाने राजे शिवाजी वॉल क्लाइंबिंग, पुणे या संस्थेच्या माध्यमातून अमोल जोगदंड आणि मांतू मंत्री या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने दोन वर्षापासून प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणामुळेच तिला या मोहिमेत आत्मविश्वास मिळण्यास मदत झाली. तसेच एस. एल. ॲडव्हेंचर, पुणे यांच्या माध्यमातून एव्हरेस्टवीर लहू उघडे यांच्या माध्यमातून मोहिमेचे आयोजन केले होते. गिर्यारोहक तुषार दिघे, केदार यांच्या माध्यमातून ही मोहीम सुरक्षा उपकरणांच्या सहाय्याने पार पडली.