जेएनपीटी बंदराची सुरक्षा रामभरोसे; सीसीटीव्ही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:40 IST2020-01-03T00:40:43+5:302020-01-03T00:40:50+5:30
अवैध व्यवसाय, चोरीच्या घटनांमध्ये वाढ

जेएनपीटी बंदराची सुरक्षा रामभरोसे; सीसीटीव्ही बंद
उरण : जेएनपीटी बंदर परिसरातील अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे बंदराच्या सुरक्षेबरोबरच परिसरात अवैध धंदे, भुरट्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भविष्यात उद्भवणारे संकट टाळण्यासाठी आणि बंदराच्या सुरक्षिततेसाठी जेएनपीटी बंदर व्यवस्थापनाने सीसीटीव्ही सुरू करून त्यांनी नियमित देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक तसेच कामगारांकडून करण्यात येत आहे.
मालवाहतुकीत देशभरात अव्वल असलेल्या जेएनपीटी बंदरातून देश-परदेशात मोठ्या प्रमाणात मालाची आयात-निर्यात केली जात आहे. परिसरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी जेएनपीटी बंदर व्यवस्थापनाने लाखो रुपये खर्च करून चांदणी चौक, वाय जंक्शन, पीयूबी, करळफाटा सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहेत; परंतु देखभाल दुरुस्तीअभावी त्यांची दैना झाली असून, सद्यस्थितीत बंदावस्थेत आहेत. गैरकारभार तसेच चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी महत्त्वाचे असलेले सीसीटीव्ही पूर्ववत सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस दिनेश म्हात्रे यांनी जेएनपीटी अध्यक्षांकडे केली आहे. याबाबत जेएनपीटी बंदर प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
बंदर परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणचे बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी जेएनपीटी बंदराच्या व्यवस्थापनाकडे अनेक वेळा मागणी केली; परंतु बंदर व्यवस्थापनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
- प्रमोद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, न्हावा-शेवा पोलीस