सर्वसामान्यांची उपचारासाठी ससेहोलपट; रायगडमधील रुग्णालयातील बेड हाऊसफुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 11:23 PM2020-09-11T23:23:32+5:302020-09-11T23:23:53+5:30

जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून आरोग्य व्यवस्था सुधारणे गरजेचे

Saseholpat for the treatment of the common; The hospital bed in Raigad is full | सर्वसामान्यांची उपचारासाठी ससेहोलपट; रायगडमधील रुग्णालयातील बेड हाऊसफुल

सर्वसामान्यांची उपचारासाठी ससेहोलपट; रायगडमधील रुग्णालयातील बेड हाऊसफुल

Next

- निखिल म्हात्रे 

अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना रु ग्णांचा आकडा सातत्याने उसळी घेत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अस्तित्वात असणाऱ्या रुग्णालयांतील बेड हाऊसफुल झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची उपचारासाठी ससेहोलपट होत असल्याचे विदारक चित्र आहे. सरकार आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अस्तित्वात असणाºया काही कोविड सेंटरमध्ये बेडची उपलब्धता नसेल, परंतु अन्य ठिकाणी बेड उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या सहा महिन्यांत रायगड जिल्ह्यात ३४ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा वाढत आलेख लक्षात घेऊन जिल्ह्यात ४५ ठिकाणी उपचार यंत्रणा सज्ज ठेवली असल्याचा दावा केला जात असला, तरी वास्तव मात्र भयावह आहे. विविध ४५ कोविड सेंटर्समध्ये ६ हजार २९ बेड तयार करण्यात आले आहेत. यामध्ये आॅक्सिजन सपोर्टेड बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर्स सुविधा कार्यान्वित करण्यात आली असली, तरी सातत्याने वाढणाºया रु ग्ण संख्येमुळे आता बेडही हाऊसफुल झाले आहेत. त्यामुळे कोरोना उपचारासाठी रुग्णालयात जाणाºया रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास विलंब होत आहे. रुग्णांना वेळेवर उपचार घेता येत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचीही चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना संसर्गाने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. अनलॉकमुळे सर्वत्र व्यवहार सुरू असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने सुरुवातीला मार्च महिन्यामध्ये नियोजन केले होते. आता मात्र प्रशासनाने गृहित धरलेल्या आकडेवारीहून अधिक कोराना रुग्ण सापडत असल्याने प्रशासनापुढील अडचणीत वाढ झाली आहे. सध्या दिवसाला सुमारे तीन हजारांच्या आसपास कोविड टेस्ट करण्यात येत आहे. त्यातील किमान साडेसातशे रुग्ण कोरोनाची शिकार होत आहेत.

प्रशासनाने निर्माण केलेल्या आरोग्य सुविधा आणि वाढत्या रुग्णांचे प्रमाण यामध्ये ताळमेळ बसणे कठीण आहे. रुग्णांना भरती करण्यासाठी बेड उपलब्ध नसल्याने त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. तर बेड मिळवण्यासाठी नातेवाइकांना विविध रुग्णालयांमध्ये भटकावे लागत आहे. नाइलाजाने रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

1. रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम केल्याचे सांगत स्वत:चीच पाठ थोपटून घेणाºया सरकार आणि जिल्हा प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. अलिबाग येथील कोविड केअर सेंटर हे अस्वच्छतेचे माहेर बनल्याचे दिसून येते. या ठिकाणी सोईसुविधांची वाणवा आहे, शिवाय वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्था नसल्याने, रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. १० सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आकडीवारीनुसार एक लाख १९ हजार ५५५ कोरोनाचे संशयित आहेत.
2. रुग्णसंख्या तब्बल ३३ हजार ६७१वर पोहोचली आहे. सद्यस्थितीमध्ये सहा हजार ९८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. २७ हजार ५७३ रुग्णांना सुट्टी दिली आहे. आतापर्यंत ९४९ रु ग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. दिवसाला ५०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बºयापैकी असले, तरी दररोज कोरोनाबाधितांना उपचारासाठी रुग्णालयात जावे लागत आहे. मात्र, सद्यस्थितीमध्ये बेड उपलब्धच होत नसल्याने हाल होत आहेत.
3. अलिबाग येथील जिजामाता कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाºया रुग्णांचे हाल होत आहेत. या ठिकाणी स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये विविध ठिकाणी घाणीचे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. रुग्णांवर उपचार करणाºया सिस्टर, वॉर्डबॉय यांनाही अशा अस्वच्छतेच्या जागी आपले काम करावे लागत आहे.
4.  सरकार आणि प्रशासनाने तातडीने यामध्ये सुधारणा करून नागरिकांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.

नेहुली येथील कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी

अलिबाग तालुक्यातील नेहुली क्रीडा संकुलामध्ये सुसज्य असे कोविड केअर सेंटर उभारले आहे. मात्र, वाढती रुग्णसंख्या असतानाही त्याचा वापर केला जात नाही. नेहुली येथील कोविड केअर सेंटर तातडीने सुरू केल्यास मुंबई आणि नवी मुंबईला रुग्णांना उपचारासाठी पाठवावे लागणार नाही. याबाबतची तक्रार अलिबाग भाजपा शहर
अध्यक्ष अ‍ॅड. अंकित बंगेरा यांनी अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Saseholpat for the treatment of the common; The hospital bed in Raigad is full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड