Sanjivani by installing gunfire on the Kathli fort | कोथळी गडावरील तोफांना तोफगाडे बसवून संजीवनी
कोथळी गडावरील तोफांना तोफगाडे बसवून संजीवनी

कर्जत : तालुक्यातील कोथळीगडावर सापडलेल्या ब्रिटिश बनावटीच्या तोफेला सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तोफागाडा बसवून नवीन संजीवनी देण्यात आली. कर्जतपासून अवघ्या ४० कि.मी. अंतरावर असलेल्या कोथळीगड उर्फ पेठ किल्ला या गडावर आजवरच्या इतिहास अभ्यासक संशोधक यांनी लिखाण केलेल्या गडाच्या इतिहासात दोन तोफांची नोंद आहे. त्यातील एक तोफ गडाच्या माचीवरील पेठ या गावात लहान उखळी तोफ आहे, तर गडावर दुसऱ्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर दुसरी ६.५ फूट लांबीची तोफ होती, अशी नोंद मिळते. बºयाच इतिहास अभ्यासकांनी गडावर तिसरी तोफ नाही, असे सांगितले.

कोथळीगडाच्या इतिहासाच्या आधारे या गडाचा मराठी इंग्रजी कागदपत्रातून तसेच मुघली कागदपत्रातून एक बलाढ्य संरक्षण ठाणे होत आणि मराठ्यांचे या गडावर शस्त्रागार होते. संभाजी महाराजांच्या काळात या गडाला विशेष महत्त्व आले होते. पुढे पेशवे काळातही हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता तर १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून याच्या वास्तूची तोडफोड केली.
९ जून रोजी लोकवर्गणीतून सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाने १० मार्च रोजी सापडलेल्या तोफेलाही लाकडी तोफगाडा बसविला व सोबत गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ गावातील लहान युरोपीन पद्धतीच्या तोफेलाही त्या पद्धतीचाच तोफगाडा बसविला. ९ जून रोजी तोफगाडा दुर्गार्पण सोहळा सकाळी पार पडला. सर्व मान्यवरांनी गडावरील तोफेची पूजा करून त्यांनी तोफगाडा अनावरण केले. गड पायथ्याशी वैभव घरत, गणेश ताम्हणे आणि पोलीस दलातील शाहीर होते. या शाहिरांनी गडकिल्ले संवर्धनाच्या पोवाड्याने संपूर्ण वातावरणही शिवमय केले. या वेळी सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक, श्रीमंत साबूसिंग यांचे वंशज दिग्विजयसिंग पवार, सरदार मानाजी पायगुडे यांचे वंशज राजकुमार पायगुडे, मंगेश दळवी, अमोल जाधव आदी उपस्थित होते.

१७ फेबु्रवारी २०१९ रोजी गडावर असलेल्या तोफेला पुरातत्त्व निकषाने तोफगाडा तयार करून त्यावर तोफ बसविण्यात आली. १० मार्च २०१९ रोजी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तोफेचा शोध घेतला असता तेव्हा गडाच्या दुसºया प्रवेशद्वाराच्या १०० फूट खाली एका भल्या मोठ्या दगडाखाली मातीत बुजलेली ४.५ फूट लांबीची तोफ सापडली.

७ एप्रिल रोजी सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाने मोहिमेची तयारी केली आणि संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेचे नियोजन झाले. या तोफेला मातीतून बाहेर काढून दोराच्या साह्याने १०० फूट वर असलेल्या प्रवेशद्वारापासून जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. जवळपास ५तास संस्थेच्या ६० सदस्यांनी भर उन्हात श्रमदान करून या तोफेला नवी संजीवनी दिली आहे. आजवर कोथळीगडावर दोन तोफा होत्या; परंतु गावकºयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तोफेचा शोध घेऊन इतिहासापासून लुप्त झालेल्या तोफेला उजाळा मिळाला असल्याचे श्रमिक गोजमगुंडे यांनी सांगितले. तसेच पुरातत्त्व विभागाने केलेल्या सहकार्याबद्दलही आभार व्यक्त केले, अशी माहिती कर्जत विभाग अध्यक्ष सुधीर साळोखे यांनी दिली.
 


Web Title: Sanjivani by installing gunfire on the Kathli fort
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.