सांबरखिंड प्रकल्प एक महिन्याच्या आत मार्गी लागेल; जलसंपदा भवन इमारतीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 00:37 IST2021-01-26T00:36:43+5:302021-01-26T00:37:14+5:30
खा. सुनील तटकरे यांनी माणगाव शहराशी माझे अतूट नाते आहे. माणगाव शहरात काळनदीवर माणगावकरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बंधारा होणे गरजेचे आहे.

सांबरखिंड प्रकल्प एक महिन्याच्या आत मार्गी लागेल; जलसंपदा भवन इमारतीचे लोकार्पण
माणगाव : कोकण हा विविधतेने नटलेला, अपार निसर्गसान्निध्य लाभलेला व पर्यटनासाठी उत्तम असा महाराष्ट्रातील एक भाग आहे. अलिबागमधील सांबरखिंड प्रकल्प एक महिन्याच्या आत मार्गी लागेल. तसेच कुंभे जलप्रकल्प व पन्हळघर येथील बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. माणगाव शहरासाठी काळनदीवर उत्तम नियोजन करून पर्यावरणाच्या दृष्टीने सोयीस्कर असा बंधारा बांधण्यात येणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव तालुक्यात जलसंपदा भवनाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्य जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली २५ जानेवारी रोजी पार पडला. यावेळी जयंत पाटील बोलत होते. खा. सुनील तटकरे यांनी माणगाव शहराशी माझे अतूट नाते आहे. माणगाव शहरात काळनदीवर माणगावकरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बंधारा होणे गरजेचे आहे. तसेच माणगाव शहरातून जो एक किलोमीटर अंतराचा कालवा गेलेला आहे, त्याचीही दुरुस्ती होणे गरजेचे आहे. कोकणातील पाणी हे इतरत्र न वळवता फक्त कोकणामध्येच पाण्याचा योग्य पद्धतीने विस्तार, वाटप व संधारण व्हावे. खासदार शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे कोकणचा कॅलिफोर्निया कसा करता येईल, यावर जास्तीत जास्त भर देऊन कोकणाला प्रगतिपथावर कसे नेता येईल, याचा पुरेपूर प्रयत्न प्रामाणिकपणे करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. या लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे आदींसह नागरिक उपस्थित होते.