श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 05:45 AM2019-10-11T05:45:00+5:302019-10-11T05:45:10+5:30

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका पर्यटनाचा केंद्रबिंदू बनला आहे. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी रस्ते हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, दिघी ते श्रीवर्धन रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाल्याचे निदर्शनास येत आहे.

 Roads in Shriwardhan taluka have been cleared | श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण

श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण

googlenewsNext

- संतोष सापते

श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका पर्यटनाचा केंद्रबिंदू बनला आहे. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी रस्ते हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, दिघी ते श्रीवर्धन रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाल्याचे निदर्शनास येत आहे.
दिघी गावाजवळच जंजिरा किल्ला आहे. विविध राज्यांतून पर्यटक जंजिरा बघण्यासाठी येतात. श्रीवर्धन-दिघीअंतर ३० कि.मी.चे आहे. जे पर्यटक श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर, दिवेआगार स्थित मंदिराच्या भेटीसाठी येतात ते आवर्जून जंजिरा किल्ल्याला भेट देतात. दिघीपासून जलवाहतुकीची सोय उपलब्ध असल्याने अवघ्या २० मिनिटांत किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. त्यामुळे पर्यटक श्रीवर्धन, बोर्लीपंचतन, गोनघरफाटा मार्गे कुडगाव ते दिघी प्रवास करणे पसंत करतात; परंतु आजमितीस या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. पुणे, मुंबईमधील पर्यटक रविवार सुट्टीसाठी श्रीवर्धनची निवड करतात. पुणे ते ताम्हणी, माणगाव, साई मार्गे श्रीवर्धन १६८ कि.मी.चे अंतर आहे. मुंबई, पनवेल, पेण, माणगाव, साई मार्गे श्रीवर्धन १९८ कि.मी.चे अंतर आहे. साधारणत: पाच तासांत पर्यटक श्रीवर्धनमध्ये पोहोचतात. श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे येणाऱ्या पर्यटकांना या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

वेळास, कुडगाव, दिघी गावांच्या हद्दीत खड्डे
मुरुड, अलिबाग, पेण, रेवदंडा स्थित श्रीवर्धनमधील रहिवाशांना समुद्रमार्गे दिघीत आल्यानंतर दिघी ते श्रीवर्धन रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रचंड त्रास होत आहे. हे ३० कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी जवळपास दीड तास लागत असल्याने श्रीवर्धनमधील नागरिक तसेच बाहेरून येणारे प्रवासी, पर्यटक संताप व्यक्त करत आहेत. वेळास, कुडगाव, दिघी गावांच्या हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वाराला गाडी चालवताना असंख्य अडचणी येत आहेत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ठ करण्यात आला. माणगाव ते वडवली गावाच्या हद्दीपर्यंत महामार्गाचे काम आले आहे. त्यामुळे हे काम पूर्णत्वास कधी जाणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत काम पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत कमीत कमी आहे त्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात यावी, जेणेकरून प्रवासी वाहतूक सुरळीत पार पडेल, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

वेळास ते दिघी रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्व स्थानिकांना त्रास होत आहे. आम्ही माणगाव, श्रीवर्धनमधील बांधकाम विभागाला त्या विषयी कळवले आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप काहीच उत्तर आले नाही, तसेच दिघी पोर्टला खड्डे बुजविण्यासाठी कळवले आहे. स्थानिक जनता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
- मधुकर भालदार,
ग्रामसेवक,
दिघी ग्रामपंचायत

दिघी रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. या मार्गावरून प्रवासी वाहतूक नियमित चालते. रस्ता खराब असल्याने त्याचा परिणाम बसच्या क्षमतेवर होत आहे.
- राजेंद्र बडे, एसटीचालक,
श्रीवर्धन आगार

मी प्रत्येक आठवडासुट्टीला माझी दुचाकी घेऊन मुरुडला गावी जातो. वेळास ते दिघी रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत, वेळीच रस्त्याचे काम केले नाही तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.
- संदीप गुरव, रहिवासी, मुरुड

दिघी हा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे, त्यामुळे तो आमच्या अखत्यारित येत नाही.
- श्रीकांत गणगणे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीवर्धन

Web Title:  Roads in Shriwardhan taluka have been cleared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड