आगरदांडा बंदरातील रस्तेवाहतूक रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 22:49 IST2018-11-25T22:48:49+5:302018-11-25T22:49:03+5:30
२७०० कोटींचा प्रकल्प : बंदराचे काम पूर्ण; चौपदरीकरणाचे काम धिम्या गतीने; अवजड वाहतुकीला ब्रेक

आगरदांडा बंदरातील रस्तेवाहतूक रखडली
- संजय करडे
मुरु ड जंजिरा : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी व मुरु ड तालुक्यातील आगरदांडा येथे जेएनपीटीच्या धर्तीवर दोन मोठे बंदर विकसित करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासन व खासगी विकासकाच्या माध्यमातून सुमारे २७०० कोटी रु पये खर्च करून बंदराचे काम सुरू करण्यात आले आहे. पैकी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे बंदर विकसित झाले असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे; परंतु मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथील दुसऱ्या टप्प्याचे काम केवळ रस्त्याच्या अरुंदीकरणामुळे रखडले आहे.
परदेशातून येणार दगडी कोळसा व अन्य कच्चा माल नियोजित ठिकाणी नेण्यासाठी १२ चाकी ट्रेलरला वाहतुकीत बाधा येत आहे. केवळ वाहतूकसमस्येमुळे आगरदांडा येथील बंदराचा अंतिम टप्पा रखडला असून औद्योगिक प्रगती खुंटली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून आगरदांडा बंदरातून मालाची वाहतूक होत नसल्याने स्थानिकांना रोजगार मिळू शकला नाही. जमीन खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने आगरदांडा परिसर मागास राहिला आहे. स्थानिक तरुणांना या कंपनीत नोकºया मिळणार होत्या; परंतु बंदराचा विकासच न झाल्याने शेकडो तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.
बंदराच्या विकासापूर्वी या ठिकाणी मोठी रेलचेल दिसून येत होती. स्थानिक विद्यार्थी पोर्टला आवश्यक असणाऱ्या जागांसाठी विविध ट्रेंडचे प्रशिक्षण घेण्यासाठीसुद्धा गेले होते; परंतु आगरदांडा बंदर सुरू न झाल्याने बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
आगरदांडा येथील बंदर विकासाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु बोटीद्वारे माल उतरवला जात नसल्याने कर्मचारी नियुक्त झालेले नाहीत. आगरदांडा-इंदापूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, काम रखडल्याने त्याचा परिणाम आगरदांडा बंदरातील मालवाहतुकीवर होत आहे.
कंपनी गेटपर्यंत भुयारी मार्ग
आगरदांडा बंदराचे पूर्ण काम झाले आहे. केवळ रस्ता रुंदीकरणाची कामे रखडल्याने बंदरातून मालवाहतूक होऊ शकत नाही. दिघी येथे जहाजांची रेलचेल सुरू असून या प्रकल्पाचा एक भाग सुरू आहे.
आगरदांडा ते इंदापूर हा चौपदरी रस्ता मंजूर करण्यात आलेला असून जून २०१९ पर्यंत हा रस्ता बनवण्याची ठेकेदारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे.
आगरदांडा येथील लोकवस्तीला कोणताही त्रास होऊ नये म्हणून डोंगर फोडून अंतर्गत भुयारी मार्ग थेट कंपनी गेटपर्यंत रस्ता आणणार असल्याची माहिती सूर्यकांत साहू यांनी दिली. त्याबरोबरच रोहा ते आगरदांडा रेल्वेमार्गालाही मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
आगरदांडा बंदर लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. विदेशातून येणारा माल हा १२ ते १६ चाकी ट्रेलरने नियोजित ठिकाणी पोहोचवण्यासाठी रस्त्याची रुं दी खूप मोठी असणे आवश्यक आहे. मुळातच आगरदांडा येथील रस्ते हे खूप निमुळते व अरुं द असल्याने वाहतुकीची समस्या गंभीर आहे.
- सूर्यकांत साहू, व्यवस्थापक, ठेकेदार कंपनी