तहसीलमधील रेकॉर्ड रूम अपटेडचे काम सुरू
By Admin | Updated: January 5, 2016 02:01 IST2016-01-05T02:01:43+5:302016-01-05T02:01:43+5:30
रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्या आदेशानुसार पनवेल तहसीलमधील रेकॉर्ड रूम अपटेड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

तहसीलमधील रेकॉर्ड रूम अपटेडचे काम सुरू
प्रशांत शेडगे, पनवेल
रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्या आदेशानुसार पनवेल तहसीलमधील रेकॉर्ड रूम अपटेड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सगळ्या रूममधील कागदपत्रांची छाननी सुरू असून, सहा ट्रक कागद निकाली काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचा डेटा संगणकावर फिड करण्यात येणार आहे. लवकरच रेकॉर्ड रूम कागदांच्या गठ्ठ्यातून मुक्त होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पनवेल तहसील अतिशय जुने असून, ब्रिटिशकालीन बिल्डिंगमध्ये कारभार मागील एक-दीड वर्षापर्यंत सुरू होता. या जागेवर प्रशासकीय भवन उभारण्याचे काम सुरू असल्याने तहसील कार्यालय महसूल प्रबोधिनीत हलविण्यात आले आहे. त्या ठिकाणीसुद्धा एक रेकॉर्ड रूम तयार करण्यात आली आहे. १८३९ पासूनचे रेकॉर्ड या रूममध्ये स्टोअर करण्यात आले होते. मोठमोठ्या गाठ्ठ्यांनी ही रूम व्यापली होती. आग लागणे, त्याचबरोबर इतर दुर्घटना येथे घडण्याची शक्यतासुध्दा व्यक्त होत होती. दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड रूममधील कागदाचे गठ्ठे अंगावर पडून आरटीओ कार्यालयात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. माहिती आणि तंत्रज्ञान त्याचबरोबर डिजिटलच्या जमान्यात गठ्ठे पद्धत खटकणारी असल्याने रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसील कार्यालयाचे रेकॉर्ड रूम अपडेट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार दीपक आकडे, नायब तहसीलदार बी. टी. गोसावी यांनी अभिलेख वर्गीकरण प्रतिष्ठानच्या मदतीने रेकॉर्ड रूममधील कागदपत्रांची छाननी सुरू आहे. त्यामध्ये एकूण सहा ट्रक कागदपत्रं निरुपयोगी असल्याने आढळून आले. हे सगळे कागद रिसायकलिंगकरिता पेपर मिलमध्ये पाठविण्यात आले असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. काही महत्त्वाच्या कागदपत्रांचे पुन्हा व्यवस्थित फायलिंग करून ठेवण्यात आले आहे. बहुतांशी माहिती संगणकीकृत करण्यात आल्याचे
अधिकाऱ्यांनी सांगितले.