अलिबागमध्ये सापडला दुर्मीळ पिवळ्या पोटाचा समुद्रसर्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 13:13 IST2025-08-03T13:13:34+5:302025-08-03T13:13:57+5:30
या सर्पमित्रांनी प्राथमिक तपासणी करून सापाला सुरक्षितपणे पुन्हा समुद्रात सोडून दिले.

अलिबागमध्ये सापडला दुर्मीळ पिवळ्या पोटाचा समुद्रसर्प
अलिबाग : येथील समुद्रकिनारी शुक्रवारी सायंकाळी एका नागरिकाला दुर्मीळ पिवळ्या पोटाचा समुद्रसर्प दिसला. क्वचितच अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर दिसतो.
आजारपण, इजा अथवा थकव्यामुळे हे साप समुद्रकिनाऱ्यावर येतात. ते समुद्रात असतात. त्यामुळे त्याची शरीररचना जमिनीवर सरपटण्यासाठी अनुकूल नसते. त्याचमुळे ते वाळूवर अडकले की पुढच्या भरतीपर्यंत ते परत समुद्रात जाऊ शकत नाहीत. यामुळे त्यांचा अनेकदा मृत्यू होतो. दुर्मीळ सापाची माहिती प्राप्त होताच वाइल्डलाइफ वॉरियर्स ऑफ अलिबाग या संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद दाभोळकर आणि सक्रिय सदस्य अदिती सगर त्वरित घटनास्थळी पोहोचले. या सर्पमित्रांनी प्राथमिक तपासणी करून सापाला सुरक्षितपणे पुन्हा समुद्रात सोडून दिले.
प्रतिसर्पविष लस उपलब्ध नाही
सर्वच समुद्रसर्प अत्यंत विषारी असून, त्यांचा दंश झाल्यास प्रतिसर्पविष लस उपलब्ध नाही. त्यामुळे असे साप किनाऱ्यावर आढळून आल्यास स्वतः त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये आणि वनविभाग अथवा वाइल्डलाइफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी केले आहे.