महोत्सवामुळे रायगड जागतिक स्तरावर जाईल
By Admin | Updated: January 5, 2016 02:03 IST2016-01-05T02:03:22+5:302016-01-05T02:03:22+5:30
रायगड महोत्सवात शिवकालीन युग पर्यटकांना अनुभवता येईल. या महोत्सवामुळे रायगड जगाच्या नकाशावर जाण्यास मदत होणार आहे.

महोत्सवामुळे रायगड जागतिक स्तरावर जाईल
अलिबाग : रायगड महोत्सवात शिवकालीन युग पर्यटकांना अनुभवता येईल. या महोत्सवामुळे रायगड जगाच्या नकाशावर जाण्यास मदत होणार आहे. या कालावधीत पर्यटकांना आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने २१ ते २४ जानेवारीदरम्यान रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी किल्ले रायगड येथे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आम. भरतशेठ गोगावले, माजी आम. प्रवीण दरेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेज हक आदी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, की या महोत्सवाच्या अनुषंगाने होणाऱ्या सर्व कार्यक्र मांच्या ठिकाणांची पाहणी केली आहे. महोत्सवाला येणाऱ्या पयर्टकांच्या सोयीसाठी येथे वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधा उपलब्ध होतील याची संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. या परिसरात रस्त्यावर लाइट लावण्याचे काम करावे तसेच पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध करावे. अग्निशमन यंत्रणा सुसज्ज ठेवावी यासाठी आवश्यक असणारा पाणीसाठा ठेवावा. अपघात होऊ नये याची खबरदारी घ्यावी, रायगड महोत्सव काळात योग्य सुरक्षा व्यवस्था ठेवावी, इतर संस्थांची मदत घेत असताना आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणा उपलब्ध झाली पाहिजे. तत्काळ आरोग्यसेवा पुरविण्यात यावी, यासाठी डॉक्टारांचे पथक किल्ल्यावर, रोप-वेच्या ठिकाणी तसेच पायी जाणाऱ्या मार्गावर मध्यभागी ही यंत्रणा ठेवावी, अशा सूचना तावडे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. (विशेष प्रतिनिधी)