'राणी'च्या सुरक्षित प्रवासासाठी माथेरान घाटात संरक्षक भिंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:15 IST2025-10-28T10:08:50+5:302025-10-28T10:15:21+5:30
भिंत बांधून झाल्यास माथेरानच्या राणीचा काम अर्थात मिनी ट्रेनचा मार्ग सुखकर होणार

'राणी'च्या सुरक्षित प्रवासासाठी माथेरान घाटात संरक्षक भिंत
नेरळ : माथेरानची 'राणी' अर्थात प्रसिद्ध मिनी ट्रेन लवकरच म्हणजे १ नोव्हेंबरला पर्यटकांच्या सेवेत धावणार आहे. मात्र, सततच्या पावसामुळे घाटातील कड्यावरचा गणपती या ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे मार्ग धोकादायक झाला होता. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने या परिसरात संरक्षणभिंत बांधून मजबुतीकरणाचे युद्धपातळीवर सुरू केले आहे. ही भिंत बांधून झाल्यास माथेरानच्या राणीचा काम अर्थात मिनी ट्रेनचा मार्ग सुखकर होणार आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेच्या कुशीतून धावणाऱ्या माथेरानच्या राणीची शीळ लवकरच गुजणार आहे. पर्यटकांच्या आवडत्या राणीचे मान्सून सुटीनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत धावणार आहे. मान्सून काळात रेल्वे घाट रस्त्यातील कड्याचा गणपती या परिसरात मोठ्या प्रमाणात उताराच्या भागात झालेल्या भूस्खलनामुळे रुळाजवळील माती कोसळून रेल्वे मार्ग असुरक्षित झाला होता. या ठिकाणी नव्याने सुरक्षा भिंती उभारण्याचे काम केले जात असून, आठ दिवसांच्या आत काम पूर्ण होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अभियंता विभागाने कळवली आहे. यासाठी रेल्वे अभियांत्रिकी विभागातील विशेष पथक घटनास्थळी तैनात असून, मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचा वापर करून काम गतीने सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर माथेरान राणी ट्रेनचा प्रवास पुन्हा एकदा सुरक्षित आणि सुगम होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
रुळावरील माती काढण्याचे काम पूर्ण
गेल्या काही आठवड्यांपासून रुळावरील माती काढण्याचे काम पूर्ण झाले. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे या कामात व्यत्यय येत आहेत. त्यामुळे सेवेत अडथळा निर्माण झाला होता. मात्र, आता संरक्षणभिंतीच्या बांधकामामुळे माथेरान घाट मार्ग पुन्हा पूर्ववत करण्याचे काम निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे.